मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (18:35 IST)

गुजरातला मिळाला पुन्हा मोठा प्रकल्प, टाटा आणि एअरबस करणार 22 हजार कोटींची गुंतवणूक

वेदांत-फॉक्सकॉन समूहाच्या मोठ्या गुंतवणुकीनंतर गुजरातला पुन्हा मोठा प्रकल्प मिळाला आहे. टाटा आणि एअरबसने पंतप्रधान मोदींच्या गृहराज्यामध्ये 22,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. टाटा आणि एअरबस येथे लष्करासाठी वाहतूक विमाने तयार करणार आहेत. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार म्हणाले, देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे ज्याअंतर्गत खाजगी कंपनी लष्करात वापरण्यासाठी विमान बनवणार आहे.
  
  या प्रकल्पासाठी एकूण 21,935 कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करणार आहेत. गुजरातमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. या प्रकल्पासाठी सरकार हजारो नोकऱ्यांचे आश्वासनही देत ​​आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये गुजरात सरकारने वेदांत-फॉक्सकॉन ग्रुपसोबत 1 लाख 54 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी करार केला.
  
  वेदांत लिमिटेड आणि तैवानची फॉक्सकॉन संयुक्तपणे गुजरातमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती करणार आहेत. त्याचा प्लांट अहमदाबादजवळ उभारला जाणार आहे. शासनाच्या विजेबाबतही करार झाला आहे. या प्रकल्पासाठी गुजरात सरकार वीजेसह अन्य सुविधा देणार आहे. यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
 
टाटा-एअरबस इतर देशांतील लष्कराला आवश्यक उपकरणे आणि तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करत आहे. यामुळे पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया' या महत्त्वाकांक्षी मोहिमेलाही चालना मिळत आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने एअरबसकडून 56 वाहतूक विमाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. करारानुसार, 16 विमाने लवकरच वितरित केली जातील आणि उर्वरित भारतात तयार केली जातील.
 
अधिकृत निवेदनानुसार, सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान, 16 विमाने तयार स्थितीत देण्यात येतील. त्याच वेळी, गुजरातमध्ये बनवलेले पहिले विमान सप्टेंबर 2026 पर्यंत उपलब्ध होईल. अद्ययावत C 295 विमाने खूप जुन्या असलेल्या Avro विमानांची जागा घेईल.