देशातल्या अनेक शहरांमधलं तापमान या उन्हाळ्यात 40 अंशांपेक्षा जास्त होतं. दिल्लीसारख्या शहरात तर पारा पन्नाशीला टेकला होता. भारतातल्या शहरांत अशी इतकी भयानक उष्णता का वाढली? या उष्णतेच्या लाटेची कारणं काय? देशातल्या इतर भागांच्या तुलनेत शहरांधला उष्मा जवळपास दुप्पट वेगाने वाढतोय. आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय. हे संशोधन नेचर या पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलंय. जगभरातली उष्णता वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण आहेच. पण भारतात झपाट्याने वाढलेलं आणि वाढत जाणारं शहरीकरण हे शहरांतल्या वाढत्या उकाड्यामागचं प्रमुख कारण असल्याचं आयआयटी भुवनेश्वरच्या संशोधनातून समोर आलंय.
संशोधन कसं करण्यात आलं?
भारतातल्या शहरी आणि ग्रामीण भागांमधल्या 141 शहरांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये तापमानात किती वाढ झाली, दिवसाचं आणि रात्रीचं तापमान किती नोंदवलं गेलं, या काळात या शहरांमध्ये काय बदल झाला, याचा अभ्यास या संशोधनासाठी करण्यात आला.
नासाच्या MODIS ( The Moderate Resolution Imaging Spectrodiometer) अॅक्वा सॅटेलाईट च्या रात्रीच्या वेळच्या तापमानांचा डेटा या संशोधनासाठी अभ्यासण्यात आला. रात्रीच्या वेळी जमिनीच्या पृष्ठभागावरून किती उष्णता उत्सर्जित होते, हे यामध्ये मोजलं जातं. तसेच तापमान बदलाचे ट्रेंड तपासण्यासाठी 2003 ते 2020 या काळातील डेटाचाही अभ्यास करण्यात आला. यासोबतच शहरी भागांमधली तापमान वाढ आणि या शहरांना लागून असलेल्या इतर भागांमधली तापमान वाढ याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
संशोधनात काय आढळलं?
भारतातल्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये वाढत असलेल्या उष्णतेबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं या संशोधनातून नोंदवण्यात आली आहेत. शहरी भाग आणि त्यांना वेढणारे निम-शहरी आणि ग्रामीण भाग याची तुलना केल्यानंतर संशोधकांना काही बाबी लक्षात आल्या. प्रदेशातल्या हवामान बदलांमुळे काही प्रमाणात उष्मा वाढलेला असला, तरी बहुतेक शहरांमधलं तापमान वाढीचं प्रमाण हे जास्त असल्याचं आढळलं.
भारतातल्या सगळ्या शहरांमधलं रात्रीचं तापमान वाढल्याचं या संशोधनातल्या डेटावरून स्पष्ट झालं. जवळपास प्रत्येक शहराच्या Nighttime Land Surface Temparature (NLST) म्हणजे रात्रीच्या वेळच्या जमिनीच्या तापमानात दर दशकाला ०.53 डिग्री सेल्शियसची वाढ झालेली आहे. त्यातही पूर्व आणि मध्य भारतातल्या शहरांमुळे शहरी तापमानवाढ अधिक झाल्याचं संशोधन सांगतं. भारतातली 60% उष्णता ही शहरीकरणामुळे वाढलेली आहे. एकूणच भारतातलं तापमान दर दशकाला सरासरी 0.26 अंश सेल्शियसने वाढतंय.
भारतातली सर्वाधिक उष्णता वाढलेली 10 शहरं
अहमदाबाद
जयपूर
राजकोट
दिल्ली राजधानी क्षेत्र
पुणे
लखनऊ
आग्रा
बंगळुरू
नाशिक
हैदराबाद
शहरांचं तापमान का वाढलं?
शहरीकरण हे वाढत्या उष्णतेमागचं मोठं कारण आहे. माणसाद्वारे जमिनीचा होणारा वापर, त्यावर होणारं बांधकाम याचा परिणाम उष्णतेवर होतोय. पृथ्वीवरच्या एकूण जमिनीपैकी फक्त 1% भूभागावर शहरं आहेत आणि याच एक टक्के जमिनीवर जगभरातली अर्ध्यापेक्षा अधिक वस्ती आहे. वेगाने आणि अनियमितपणे होणाऱ्या शहरीकरणामुळे सामाजिक समस्यांसोबतच पर्यावरण विषयक समस्याही वाढत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे इथली दाटीवाटी वाढली आणि मोकळ्या जमिनी कमी झाल्या. शहरातली हिरवळ कमी झाली.
बांधकामांमध्ये काँक्रीट आणि अस्फाल्टचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ही मटेरियल्स उष्णता शोषून घेतात. त्यामुळे दिवसा वाढलेलं तापमान सूर्यास्तानंतरही पटकन कमी होत नाही. निमशहरी, ग्रामीण भागांमध्ये दिवसा वाढलेली उष्णता पटकन कमी होत असल्याने रात्री थंड असतात. पण शहरांमध्ये काँक्रीटमधून ही उष्णता उत्सर्जित होत राहते आणि म्हणूनच शहरांमधलं रात्रीचं तापमानही वाढतं. याला अर्बन हिट आयलंड इफेक्ट म्हणतात. म्हणजे काय तर शहरी भागांत अशी उष्णतेची बेटं तयार होतात आणि त्या भागांमध्ये आसपासच्या परिसरापेक्षा जास्त उष्णता असते. याविषयी नीरी संस्थेचे संचालक डॉ. अतुल वैद्य सांगतात, "काँक्रीटच्या इमारती, जास्त लोकसंख्या आणि वातानुकूलन यंत्रं यामुळे शहरातील तापमानात जास्त वाढ होत आहे. तसेच रस्त्यावरील एसी वाहनं देखील शहरातील तापमानवाढीला जबाबदार आहेत. एसी आतमध्ये जितकं थंड कतो, तितकीच बाहेर उष्णता फेकतो. तसंच काँक्रीटच्या घरांबद्दलदेखील आहे. काँक्रीटमुळे घरातून रेडीएशन बाहेर येतं. त्यामुळे सिमेंट काँक्रीटची घरं जास्त गरम होतात. याउल ग्रामीण भागातील मातीची घरं लवकर थंड होतात."
वाढत्या शहरी उष्णतेचे परिणाम
मानवी हस्तक्षेपामुळे शहरातलं तापमान वाढतं आणि त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होत राहतो. म्हणजे शहरीकरणामुळे इथलं तापमान वाढलं. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर होतो. डीहायड्रेशन, उष्माघात, हृदयाशी संबंधित विकार आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचं शहरातलं प्रमाण वाढतं. लहान मुलं, वयस्कर व्यक्ती आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तींवर या वाढत्या उष्म्याचा सर्वाधिक परिणाम होतो. मानवी आरोग्यासोबतच शहरी तापमानवाढीचे इतर गोष्टींवरही परिणाम होतात. वाढत्या शहरीकरणासोबतच त्या शहराकडून येणारी उर्जेसाठीची मागणी आणि वापर यांत वाढ होते. सोबतच या शहरांमधून उत्सर्जित होणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढतं. या सगळ्या गोष्टी क्लायमेट चेंज - हवामान बदलाला हातभार लावणाऱ्या असतात. पाऊस आणि प्रदूषण या गोष्टींवरही वाढलेल्या शहरी तापमानाचा परिणाम होतो. दाटीवाटीने वाढलेल्या शहरांमध्ये लोकसंख्येची घनताही जास्त असते. याचा ताण त्या शहराच्या पायाभूत सुविधांवर येतो. वातावरण बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींवेळी ही लोकसंख्येची घनता घातक ठरू शकते. उष्णतेची लाट, मोठा पाऊस किंवा पूर येणं यासारख्या हवामान बदलाचे परिणाम असणाऱ्या नैसर्गिक संकटांमध्ये शहरी घनता धोक्याची ठरते. उष्णतेची लाट आता दर उन्हाळ्यात दिसते. याचं एक कारण हीट डोम आहेत. उन्हाळ्यात जमिनीवरून गरम हवा वर जाते, वातावरणातला उच्च दाब ती गरम हवा खाली ढकलतो ज्यामुळे ही हवा कॉम्प्रेस होते खाली दाबली जाते आणि तापमान आणखी वाढतं.
शहरी तापमानवाढीवर उपाय काय?
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या पाहणीनुसार 2050 पर्यंत जगभरातल्या 10 पैकी 7 लोक हे शहरी भागात राहत असतील. शहरांमधली तापमान वाढ रोखण्यासाठी वा कमी करण्यासाठी प्रत्येक शहरानुसार वेगवेगळी उपाययोजना करावी लागणार असल्याचं IITच्या संशोधकांनी म्हटलंय. शहरांमधली हिरवळ वाढवल्याने त्याचा परिणाम दिवसाचं तापमान नियंत्रित करण्यासाठी होऊ शकतो. पण रात्रीच्या वेळी काँक्रीट - अस्फाल्टमधून होणारं उष्मा उत्सर्जन यामुळे रोखलं जाणार नाही. म्हणूनच भविष्यामध्ये शहरात होणारी बांधकामं आणि त्यासाठी वापरलं जाणारं साहित्य हे तापमान वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल. शहर नियोजन आणि धोरणं यांची आखणी ही शहरी तापमान वाढ लक्षात घेऊन करावी लागेल.
Published By- Dhanashri Naik