1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 डिसेंबर 2023 (17:03 IST)

‘इंडिया’ आघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी कितपत तयार आहे?

INDIA
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराजयासोबतच विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीबद्दलही अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेसने या निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्षांना सोबत न घेता निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता.
 
तीन राज्यात काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर आता ‘इंडिया’ आघाडीतील अनेक मित्रपक्षांनी काँग्रेसवर इतर पक्षांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
 
आपल्या मित्रपक्षांची नाराजी आणि त्यांची गरज लक्षात घेता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 6 डिसेंबरला ‘इंडिया’ची बैठकसुद्धा बोलावली होती.
 
मात्र आघाडीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे या बैठकीला येण्यास नकार दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही समावेश होता.
 
ममता बॅनर्जी यांनी अतिशय कठोर शब्दात या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलेला. सध्यातरी ही बैठा डिसेंबर महिन्यातल्याच नंतरच्या तारखेला पुढे ढकलण्यात आलीये.
 
तरी, 6 डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील बहुतांश मित्रपक्षांचे संसदीय पक्षाचे नेते एकत्र आले होते. यावेळी संसदेतील ‘इंडिया’च्या घटक पक्षांचं धोरण आणि भविष्यातील राजकारणावर चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस खासदार राहुल गांधीही उपस्थित होते.
 
वरिष्ठ पत्रकार रशीद किडवई म्हणतात, "विरोधी आघाडी यासाठी तयार करण्यात आली होती जेणेकरून ते एकत्रितपणे भाजप किंवा नरेंद्र मोदींशी स्पर्धा करू शकतील. प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन जवळपास 150 जागा मिळवू शकतात.
 
परंतु इतर 200 जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात स्पर्धा आहे. तीन राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीने त्यांची निराशा झाली आहे. आता ते विचार करतायत की, सर्वजण एकत्र जरी आले तरी त्यांचा भाजपसमोर टिकाव लागू शकेल की नाही.”
 
नितीश कुमारांनी मौन सोडलं
‘इंडिया’ आघाडीच्या अनेक मित्रपक्षांनी काँग्रेसवर आघाडीला महत्त्व देत नसल्याचा आरोप केलाय. अनेक नेत्यांनी याप्रकरणी जाहीरपणे वक्तव्येही केली आहेत.
 
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही यात समावेश आहे, मागच्या महिन्यातच नितीश कुमार यांनी काँग्रेसवर आघाडीबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला होता.
 
पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यांच्या मिळून लोकसभेच्या एकूण 82 जागा आहेत आणि ही राज्ये ‘इंडिया’ आघाडीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत.
 
तरी बुधवारी (6 डिसेंबर) ममता बँनर्जी यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसलं. त्यांचं म्हणणं आहे की लवकरच ‘इंडिया’ आघाडीची बैठक होईल. शिवाय नितीश कुमार यांनीही आपलं मौन सोडत काँग्रेसला थोडा दिलासा दिला.
 
बुधवारी (6 डिसेंबर) नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं, “ताप, सर्दी आणि खोकल्यामुळे मी स्वत:ला पाच दिवस सर्वांपासून अलिप्त ठेवलेलं. आम्ही वारंवार हे सांगितलंय की आता वेळ आलेली आहे. एकत्र बसून लवकरात लवकर सर्व गोष्टी ठरवून टाकूया.”
 
नितीश कुमार यांचा इशारा 2024 च्या लोकसभा निवडणुकांकडे होता.
 
नितीश कुमार यांनी जागा वाटप लवकर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जनता दल युनायटेडच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणी काँग्रेसला आघाडीबाबत उदार दृष्टीकोन ठेवण्यास सांगितलं होतं.
 
वरिष्ठ पत्रकार कन्हैया भेलारी म्हणतात, “हे सर्व करण्यामागे या लोकांची अशी इच्छा आहे की नितीश कुमार यांना ‘इंडिया’ आघाडीचा समन्वयक बनवण्यात यावं, यात दुसरा कोणताही हेतू नाहीए.”
 
“पाच राज्याच्या निवडणूक निकालांमध्ये मला काँग्रेससाठी काहीही निराशाजनक दिसत नाही. निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी असं सांगते की भाजपच्या तुलनेन काँग्रेसला जवळपास 10 लाख मतं जास्त मिळाली आहेत.”
 
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इथवर दावा केलाय की येणा-या काळात ‘इंडिया’ आघाडी आणखी मजबूत होईल.
 
अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे, “लोकांना परिवर्तन हवंय, हा भाजपसाठी चिंतेचा प्रश्न आहे. देशातील जनतेची भाजपला हटवण्याची इच्छा आहे. मध्य प्रदेशमध्ये वेगळ्या प्रकारची आघाडी असती तर निकाल वेगळे लागले असते.
 
वरिष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या म्हणण्यानुसार विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये ज्या प्रकारचा संवाद होतोय त्याला 3 डिसेंबरचे निकाल कारणीभूत आहेत. या निकालानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचा उत्साह कमी झालाय.
 
ते म्हणतात की, पटना, बंगळुरू किंवा मुंबईतील बैठकांमध्ये आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जो उत्साह, सहकार्य आणि आशा दिसत होती ती कमी झाली आहे.
 
अखिलेश यांनी काँग्रेसवर मध्य प्रदेशात आघाडी न केल्याने पराभव पत्करावा लागल्याचा आरोप केलाय.
 
या प्रकरणी त्यांनी भलेही तिखट प्रतिक्रिया दिली नाही, परंतु पराभवानंतर ‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये सातत्याने वाक् युद्ध रंगलेलं पाहायला मिळतंय, त्यामुळे या आघाडीची एकजूट आणि भविष्यावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
 
शाब्दिक लढाई
केंद्रातील मोदी सरकारचा 2024 साली होणा-या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
 
मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीऐवजी काँग्रेसने स्वबळावर भाजपला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये फरक असतो, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
याच कारणास्तव ज्या बिहारमध्ये विरोधी आघाडीच्या 'इंडिया'चा पाया रचला गेलेला आणि गेल्या जवळपास वर्षभरापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत होते, तिथेही विरोधी आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध सुरू आहे.
 
निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने हा ‘इंडिया’ आघाडीचा नव्हे तर काँग्रेसचा पराभव असल्याचं म्हटलंय.
 
आरजेडी आणि जनता दल युनायटेडने आघाडीबाबत काँग्रेसला इतर पक्षांना सोबत घेण्याचा, चांगलं सहकार्य करण्याचा आणि जागांचं योग्य वाटप करण्याचा सल्लाही दिलाय. यात जेडीयूचे खासदार लालन सिंह आणि आरजेडीचे मनोज झा यांसारख्या मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे.
 
याप्रकरणी बिहारमधील नवादा येथील हिसुआ मतदारसंघातील काँग्रेसच्याच आमदार नीतू कुमारी यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय.
 
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नीतू कुमारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, 2024 सालच्या लोकसभा निवडणुका ‘बिहार मॉडेल’नुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या पाहिजेत.
 
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेससह अनेक भाजपविरोधी नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
 
काहींनी तर यासाठी ईव्हीएमला दोषी ठरवलंय. या प्रकारच्या निवडणूक निकालानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
पराभवाबाबत मतभेद
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांचं नेतृत्व करणारे कमलनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, “वातावरण कसं होतं हे तुम्ही सर्वांना माहित्येय. आमच्या एका उमेदवाराने सांगितले की त्याला त्याच्या गावात 50 मतं मिळाली. हे कसं झालं?"
 
कमलनाथ यांच्यावर मध्य प्रदेशात ‘इंडिया’ आघाडीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला गेलाय.
 
निवडणुकीदरम्यान भोपाळमधील ‘इंडिया’चा मेळावा रद्द करणं आणि विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी न करण्यामागे कमलनाथ असल्याचं मानलं जातंय.
 
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही निवडणूक निकालांसाठी ईव्हीएमला जबाबदार धरलंय.
 
दिग्विजय सिंह म्हणतात, "आम्ही बटण दाबलं, पण मत कुठे गेलं हे कळतंच नाही. ‘व्हीव्हीपॅटची’ची स्लिप हातात का मिळत नाही? मूळ मुद्दा असा आहे की ज्या मशीनमध्ये चिप लावली आहे, ते हॅक होण्याची कायम शक्यता असते."
 
मतदानासंबंधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एक प्रकारे पाठिंबा दिलाय. निवडणुकीचे निकाल रहस्यमय असल्याचं मायावतींनी म्हटलंय. निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात चुरशीची लढाई दिसत होती, असा त्यांचा दावा आहे.
 
वरिष्ठ पत्रकार रशीद किडवई म्हणतात, “इंडिया आघाडीचे पक्ष वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीचे पक्ष आहेत. त्यांनी फक्त एका उद्देशाने मोट बांधली आहे की 2024 साली भाजप आणि नरेंद्र मोदींना एकत्रितपणे विरोध करायचा आहे. पण 3 डिसेंबरनंतर त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालाय."
 
2004 सालचं 'इंडिया शायनिंग'
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांचं म्हणणं आहे की या राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी निराशाजनक नाहीए, त्यामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीचं चित्र वेगळं दिसतंय.
 
शिवानंद तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, "जिथे प्रादेशिक पक्ष आहेत तिथे योग्य पद्धतीने आघाडी झाली तर भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. बिहारमध्ये हे आधीच सिद्ध झालंय की जेव्हा दोन मोठे पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांनाच बहुमत मिळतं. इथे जेडीयू आणि आजेडीची महाआघाडी आहे, त्यामुळे इथे सगळं हिरवंगारच दिसेल."
 
मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच लागतील असं नाही.
 
2018 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर, तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता आणि काँग्रेसने आपलं सरकार बनवलं होतं.
 
पण या विजयानंतरही 2018 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या विजयाच्या वातावरणाचा फायदा देशातही झाला नाही आणि या तीन राज्यातही झाला नाही.
 
2019 साली भाजपने मध्य प्रदेशात लोकसभेच्या 29 पैकी 28 जागांवर विजय मिळवला होता.
 
तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी 9 जागा भाजपच्या वाट्याला गेलेल्या. राजस्थानच्या सर्वच्या सर्व 25 जागा एनडीएला मिळाल्या होत्या, त्यापैकी 24 जागा भाजपला मिळालेल्या.
 
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सात जागांवर विजय मिळाला होता.
 
पण 2015 आणि 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला.
 
वरिष्ठ पत्रकार कन्हैया भेलारी म्हणतात, “भाजपला मतदारांच्या मनावर बिंबवायचंय की ते 2024 साली केंद्रात हॅट्ट्रिक साधणार आहे. मोदींनी तेलंगणातही भरपूर प्रचार केला, पण त्याचा परिणाम काय झाला."
 
“यापूर्वी कर्नाटकात हनुमानाविषयी बोललं गेलं होतं. सध्या तीन राज्यांत काँग्रेसचा नक्कीच पराभव झालाय, पण ते स्पर्धेतून बाहेर गेलेले नाहीत."
 
कन्हैया भेलारी सांगतात, "2003 साली मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला होता, परंतु 2004 च्या निवडणुकीत भाजपचा 'इंडिया शायनिंग'चा नारा चालला नाही आणि केंद्रातून त्यांचं सरकार गेलं."
 
खरंतर 2003 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजप खूप उत्साहात होता. भाजपने त्या काळात ‘इंडिया शायनिंग’चा नाराही दिलेला.
 
त्यावेळी केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 2004 सालच्या लोकसभा निवडणुका नियोजित वेळेच्या सहा महिने आधी घेण्याचा निर्णय घेतला होता.
 
मात्र लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएला अपेक्षेच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला.
 
Published By- Priya Dixit