गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 डिसेंबर 2020 (11:50 IST)

बंगळुरूच्या आयफोन फॅक्टरीत तोडफोड, 100 हून अधिक कामगारांना अटक

बंगळुरूतील आयफोन फॅक्टरीत कामगारांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. बंगळुरू पोलिसांनी या घटनेप्रकरणी आतापर्यंत 100 हून अधिक जणांना अटक केलीय. पगार न दिल्याचा आरोप करत कामगारांनी कंपनीत तोडफोड केली.
 
बंगळुरूतील विस्रों इन्फोकॉम (Wistron Infocomm) या कंपनीत ही घटना घडली. ही कंपनी मूळची तैवानची आहे. बंगळुरूत या कंपनीची आयफोन बनवण्याची फॅक्टरी आहे.
 
कर्नाटकची राजधानी असलेली बंगळुरू भारताचं आयटी हब म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. त्यात ही घटना आयफोन बनवणाऱ्या कंपनीत घडल्यानं या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर या घटनेचे व्हीडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. विस्त्रों इन्फोकॉमच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलीटी विभागातील सीसीटीव्ही कॅमेरा, ग्लास पॅनेल्स, लाईट्स आणि कार अशा अनेक गोष्टींची तोडफोड या कामगारांनी केली.
 
गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पगार दिला जात नाही आणि त्यात अधिकचं काम करण्यासाठी दबाव आणला जातोय, असा आरोप या कामगारांचा आहे. तर विस्त्रो इन्फोकॉम कंपनीचं म्हणणं आहे की, आम्ही स्थानिक कामगार कायद्याचं पालन करतोय.
AFP वृत्तसंस्थेला या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं तोडफोडीसाठी थेट कामगारांना दोषी धरलं नाहीय. तर ही तोडफोड बाहेरील काही अज्ञात व्यक्तींनी केली, त्यांचा हेतू चांगला नव्हता. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलीटी विभागात नुकसान झालं आहे.
 
तसंच, तोडफोड झालेल्या ठिकाणी लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केलाय.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी नरसापुरा येथील इमारतीतून रात्रपाळी संपवून जवळपास 2,000 कामगार परतत असताना ही हिंसक घटना घडली.
 
कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालयं, फर्निचर, काचेचे पॅनल्स, दरवाजे इत्यादी गोष्टींची तोडफोड करण्यात आली.
 
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
कामगारांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिलीय.
 
ट्रेड युनियनचे नेते सत्यानंद यांनी आरोप केलाय की, या कंपनीत कामगारांचं क्रूरपणे शोषण होत आहे. राज्य सरकारनेही कामगारांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली करण्यास कंपनीला परवानगी दिलीय.
 
विस्त्रों इन्फोकॉमच्या या कंपनीत जवळपास 15 हजार कामगार काम करतात, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिलीय. यातले बरेचजण हे कंत्राटी कामगार आहेत.
 
दरम्यान, या घटनेवर बीबीसीने अॅपल कंपनीची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तातडीने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मॅन्युफॅक्चरिंग साईट्सवरील कामाची स्थिती गंभीरपणे घेत असल्याचं सांगितलं आहे.