गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (12:39 IST)

माधुरी पुण्यातून लोकसभा लढणार?

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार चाचपणी सुरू आहे. यासाठी भाजप अध्यक्ष अमितशहा यांनी 'संपर्क फॉर समर्थन' मोहीम सुरू केली होती. याच मोहिमेतून प्रतिभाशाली बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट शहा यांनी जून महिन्यात घेतली होती. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरीला पुणे लोकसभा मतदारसंघातून 
निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 
 
वरिष्ठ भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, माधुरीचे नाव पुणे लोकसभा निवडणुकीसाठी 'शॉर्टलिस्ट' करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माधुरीला उमेदवारी देण्यासाठी भाजप गांभीर्याने विचार करत आहे. तिच्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ योग्य राहील, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 
 
बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवून आजही प्रकाशझोतात असलेली 51 वर्षीय माधुरी सुद्धा निवडणूक पर्यायावर गांभीर्याने विचार करत असल्याचेही त्या नेत्याने नमूद केले. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून जागा खेचली होती. भाजपच्या अनिल शिरोळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून तब्बल तीन लाख मतांनी विजय मिळवला होता. सेलिब्रेटींना निवडणुकीत रिंगणातउतरविण्याची आयडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे.