1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:22 IST)

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण

राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिकांत गोळीबार झाला होता, यामध्ये पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आले, सुनील वाल्टे हे  लष्करात नायब सुभेदार पदावर होते.
 
जवान सुनील वाल्टे लवकरच सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुदत वाढवून घेतली होती. ती मुदतही संपत आली होती. सुनील वाल्टे यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे आईवडिल शेतकरी आहे. वाल्टे यांची मुलगी नववीत शिकत आहे. तर मुलगा 5 वर्षांचा आहे.
 
देशातील विविध ठिकाणी कर्तव्य निभावणाऱ्या सुनील वाल्टे यांना नुकतीच बढती मिळाली होती. नायब सुभेदार पदावर बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईत वाल्टे गंभीर जखमी झाले, नंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र यावेळी त्यांनी आपले प्राण गमावले आहे. वाल्टे यांनी दहिगावमध्येच प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यांनी आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण कोपरगावमध्ये पूर्ण केले होते. यानंतर ते सैन्यात भरती झाले होते. झाल्टे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.