रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:41 IST)

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये “हा” मोठा बदल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दिवशी म्हणजे  (दि. १९) मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद राहणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी ५.४५ ते ७.३० वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मुंबई मेट्रोच्या मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन या मार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मेट्रोमधून प्रवास देखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी म्हणून मेट्रो वनची सेवा १९ जानेवारीला संध्याकाळी पावणेदोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.
 
अंधेरी पूर्व परिसरामध्ये अनेक कार्यालये आहेत. संध्याकाळी ज्या वेळेमध्ये मेट्रो सेवा बंद असणार आहे, त्याच वेळेत अनेक कार्यालय सुटतात. त्यामुळे अनेक लोक घरी परतण्यासाठी किंवा लोकलच स्टेशन गाठण्यासाठी मेट्रोवर अवलंबून असतात. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद ठेवण्यात येणार असल्याने घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन देखील मेट्रोकडून करण्यात आले आहे.
 
दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान अंधेरी पूर्वमधील गुंदवली मेट्रो स्थानकाचे उद्धाटन करणार आहेत. २०१५ मध्ये याच मार्गिकांच्या कामाची पायाभर देखील पंतप्रधानांच्याच हस्ते करण्यात आली होती. मोदींच्या स्वागताची आणि मेट्रो टू ए आणि मट्रो सेव्हन या मार्गांच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मेट्रो स्टेशन परिसरामधील भिंती सजवल्या आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उपयायोजना करण्यात आल्या आहेत. याच कारणास्तव मेट्रो वनची सेवा देखील संध्याकाळी पावणेदोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
 
Edited by :  Ratnadeep Ranshoor