गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 मे 2023 (13:43 IST)

मोचा चक्रीवादळ पूर्ण माहिती व महाराष्ट्रावर काय होणार त्याचा परिणाम ?

cyclone
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्याचं मोचा चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत पुढे पुढे सरकत आहे. मोचा वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर या आठवड्यातच धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
 
या वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ शुक्रवारी तीव्र रुप धारण करु शकतं, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते या चक्रीवादाळाचा ताशी वेग १३० किलोमीटरपर्यंत असू शकतो.
 
महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा
मोचा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात ही होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट ओढावलं आहे. पीकांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
हवामान खात्याचे मते, मोचा चक्रीवादळ ११ मेपर्यंत मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर १२० किमी/प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यानंतर मोका दिशा बदलून उत्तर-ईशान्य दिशेने सरकू लागेल.
 
पुढे हे चक्रीवादळ बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीजवळ मोका पोहोचेल. मात्र, बांगलादेश किनार्‍याकडे सरकल्याने ते अधिक धोकादायक होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना आधीच अलर्टवर ठेवण्यात आले आहे. कारण चक्रीवादळाचा सध्याचा ट्रॅक हा बेटांच्या अगदी जवळ असल्याचा अंदाज आहे.
 
कुणी दिलं मोचा हे नाव?
जागतिक हवामान संघटना  आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देशांची नाव आहे. प्रत्येक देश एका एका चक्रीवादळाला नाव देतो. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या चक्रीवादळाचं नाव भारताने सुचवलेले नाही.
 
अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर चक्रीवादळाचं नाव ठेवणारा एक संघ आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संघातील प्रत्येक देश चक्रीवादळाचं नाव सुचवत असतो. अर्थात एका देशाला एकच नाव एकावेळी सुचवता येतं, नंतर दुसरा देश चक्रीवादळाला नाव देतो. हे नाव येमेनने सुचवलेलं आहे.मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?
 
मोचा नावामागची गोष्ट?
येमेनने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या 'मोचा' या बंदराच्या नावावरुन सुचवलं आहे. त्यामुळे या देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे.
 
कुठपर्यंत दिसणार परिणाम?
आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चक्रीवादळ येईल असा अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीस दक्षिण बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कमी दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. या चक्रीवादळाचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत दिसू शकतो.
 
हवामान विभाग काय म्हणाले?
हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच चक्रीवादळ याबाबत अलर्ट दिला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चक्रीवादळामुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचं आधीच सांगितलं आहे. याशिवाय समुद्रकिनाऱ्याजवळ कोणीही जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. या काळात ओडिसामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?
या सोबतच पश्चिम बंगालच्या खाडीलगत असलेल्या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. येत्या चार दिवसांसाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor