गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 जुलै 2018 (16:35 IST)

आता चित्रपटातच्या सब टायटल्ससाठीही सेन्सॉरशिप

यापुढे चित्रपटातील संवादांसाठी वापरल्या जाणाऱ्या सब टायटल्ससाठीही आता सेन्सॉरशिप घ्यावी लागेल, असा अजब निर्देश सेन्सॉर बोर्डाने केला आहे. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा)ने या निर्देशांना विरोध केला असून त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
 
इम्पाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, सेन्सॉर बोर्डाकडे जे चित्रपट दाखल होतात, त्यांच्यावर कातरी चालवण्यात येते आणि त्याचं एक प्रमाणपत्र निश्चित केलं जातं. पण, या नवीन निर्देशानुसार, एकदा प्रमाणपत्र मिळवल्यानंतर चित्रपटामध्ये ज्या भाषांची सब टायटल्स दाखवली जाणार आहेत, त्या सर्वांसाठी वेगळी प्रमाणपत्रं मिळवणं गरजेचं असेल. ही खूप वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया आहे. मुळात चित्रपटात जे संवाद म्हटले जाणार आहेत, सबटायटल्स हे त्यांचंच इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतलं भाषांतर असणार आहे. त्यासाठी वेगळी सेन्सॉरशिप असणं, हा दावा अजब आणि तितकाच अन्यायकारक आहे, असं इम्पाचं म्हणणं आहे.
 
ही सेन्सॉरशिप चित्रपटांवर लादून काहीही फायदा नाही, कारण डीजिटल माध्यमातून चित्रपट सहज उपलब्ध होतात, असंही इम्पाने आपल्या याचिकेत नमूद केलं आहे. या याचिकेवर सुनावणी होणं बाकी असून पुढील आठवड्यात तिच्यावर सुनावणी सुरू होणार आहे.