शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2023 (08:58 IST)

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्सप्रेस अपघातातील मृतांचा आकडा 233वर, 900हून अधिक जण जखमी

तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथून पश्चिम बंगालमधील कोलकात्यानजिकच्या हावडा रेल्वे स्थानकापर्यंत धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला शुक्रवारी (2 जून) सायंकाळी अपघात झाला. यादरम्यान, कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे घसरून बाजूने येणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्सप्रेस तसंच एका मालगाडीलाही धडकले.
अशा प्रकारे एकूण तीन रेल्वेंची एकमेकांना धडक बसून झालेल्या या विचित्र अपघातात मोठी जिवितहानी झाली आहे.
 
शनिवारी (3 जून) सकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 233 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले आहेत.
 
बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती स्पेशल रिलीफ कमिशनर ऑफिसने दिली. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक आदेश जारी केले आहेत.
 
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, रेल्वेमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
ओडिशातील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
 
"अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. रेल्वेमंत्र्यांशी बोललो. ते घटनास्थळी रवाना झाले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातात सापडलेल्या सर्वांना सर्वतोपरी साहाय्य केलं जाईल", असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
 
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. बालासोर, ओडिशा येथील रेल्वे अपघाताच्या वृत्ताने मन व्यथित झाले. अपघातात जीव गमावलेल्या लोकांप्रति श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना.
 
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी स्पेशल रिलीफ कमिशनर कंट्रोल रुमला भेट दिली. जखमींवर लवकरात लवकर उपचार सुरू व्हावेत यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
 
200हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत मात्र जखमींची संख्या जास्त आहे. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मोठ्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या अपघातामुळे अन्य ट्रेन्सची वाहतूक नियंत्रित किंवा स्थगित करावी लागणार आहे त्यामुळे त्या ट्रेनमधल्या प्रवाशांना पाणी, अन्न याबरोबरीने सुरक्षेसंदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
बीबीसीचे सहयोगी पत्रकार सुब्रत कुमार पति यांनी सांगितलं की हा अपघात तीन गाड्यांचा मिळून झाला आहे. रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सुब्रत यांच्याशी बोलताना सांगितलं, "शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 डबे ओडिशातल्या बालासोर जवळच्या बाहानगा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले. हे डबे बाजूच्या रुळावरुन जाणाऱ्या यशवंतपूर हावडा ट्रेनला जाऊन धडकले. यामुळे यशवंतपूर-हावडा ट्रेनचे काही डबेही घसरले. हे डबे घसरल्यानंतर जवळच्या एका मालगाडीला जाऊन आदळले".
 
दरम्यान "बालासोर मेडिकल कॉलेज, एससीबी मेडिकल कॉलेज, बालासोर जिल्हा रुग्णालय आणि भद्रक जिल्हा रुग्णालय यांच्या तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत जेणेकरुन जखमींवर लवकरात लवकर उपचार सुरू होतील", अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितलं.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलंय.
 
कोरोमंडल एक्सप्रेस अपघाताचं वृत्त ऐकून दुःख झालं. या घटनेच्या माहितीसाठी आम्ही ओडिशा सरकार आणि दक्षिण-पूर्व रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने संपर्कात आहोत. या अपघातानंतर लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही एक पथक पश्चिम बंगालवरून पाठवत आहोत. मी आणि राज्याचे मुख्य सचिव या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहोत, असं त्या म्हणाल्या.
 
Published By- Priya Dixit