बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (08:50 IST)

आंतराष्ट्रीय मानवी तस्करांची टोळी पकडली

आंतराष्ट्रीय मानवी तस्करीत सहभागी असलेल्या दोन टोळ्यांचा मुंबईतील सहार आणि वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. यात मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी अटक केली. राजूभाई गमलेवाला आणि इम्तियाज अब्दुल करीम मुकादम अशी या दोघांची नावे आहेत. यातील राजूभाईने गुजरातमधील सुमारे 300 हून अधिक अल्पवयीन मुलांना विदेशात पाठविल्याचे बोलले जाते. ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 
 
अंधेरी येथे प्रिती सूद नावाची एक अभिनेत्री राहत असून 4 मार्च 2018 रोजी ती यारी रोडवरील श्रुंगार या  ब्युटीपार्लरमध्ये गेली होती. या ब्युटीपार्लरमध्ये दोन अल्पवयीन मुलींना मेकअप करण्यासाठी आणले होते. या दोेन्ही मुली मूळच्या गुजरातच्या असून त्यांना अमेरिकेत पाठविले जाणार आहे अशी माहिती तिला समजली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर वर्सोवा पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे जाऊन या दोन्ही मुलींची सुटका केली. चौकशीत या मुलींना तस्करीमार्गे विदेशात पाठविले जाणार होते. 
 
याच गुन्ह्यात नंतर  ताजुउद्दीन अब्दुलगनी खान, रिझवान इब्राहिम चोटाणी, अफजल इब्राहिम शेख, आमीर अझहर खान या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या चौघांच्या चौकशीत राजूभाई नावाच्या एका एजंटचे नाव समोर आले होते. राजूभाई हा गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहत असून तोच गरीब मुलांना मुंबईत आणून त्यांना बोगस पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे अमेरिकेत पाठवित असल्याचे उघडकीस आले. यापूर्वीही त्याने अशाच काही मुलांना विदेशात पाठविले होते. त्यामुळे या राजूभाईचा वर्सोवा पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना चकवून पळून जात होता. अखेर पाच महिन्यानंतर त्याला अहमदाबाद येथून पोलिसांनी अटक केली.