अग्निपथला विरोध : सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ
'अग्निपथ' योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन होत असताना, हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पुकारलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागलं. शुक्रवारी सकाळीचं शेकडोच्या संख्येने तरुण रेल्वे स्थानकावर जमले. फलाटावर जाऊन त्यांनी तिथल्या दुकानांची नासधूस केली. तिथेच असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "अंदाजे दोन हजार आंदोलक रेल्वे स्थानकात घुसले होते."
आंदोलकांनी रेल्वे पार्सलमधून माल उचलून रुळांवर ठेवला आणि आग लावली.
आंदोलकांनी तिरुपती-सिकंदराबाद ट्रेनसह काही गाड्यांचे काही डबे पेटवल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनलीय.
बीबीसी तेलुगूच्या रिपोर्टर सुरेखा अब्बुरी सांगतात, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, तसेच हवेत गोळीबार केला. यात दहाहून जास्त राउंडफायर केले.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये नेमके किती लोक जखमी झाले आहेत याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, या निदर्शनांमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बीबीसीची टीम या वृत्ताची स्वतंत्रपणे पडताळणी करू शकलेली नाही.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 वर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रेल्वे सुरक्षा दलासह तेलंगणा पोलीसही रेल्वे स्थानकावर पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
शेकडो तरुणांचा जमाव अजूनही रेल्वे स्टेशनमध्येच आहे. हे आंदोलक आपल्या हातात 'लष्कर भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी न्याय' अशा आशयाचे फलक घेऊन उभे आहेत. या आंदोलनात उत्तर भारतीयांसोबतचं स्थानिकांनीही सहभाग घेतला होता.