रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (13:06 IST)

संसद : नव्या इमारतीत प्रवेशानं नव्या भविष्याचा श्रीगणेशा - नरेंद्र मोदी

भारतीय संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा आज (19 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. आजच भारतीय संसदेतील सर्व खासदार नव्या इमारतीत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी जुन्या इमारतीतल्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदार एकत्र आले असून, संसदेतील आठवणींना उजाळा देत आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "नव्या संसद भवनात सर्व मिळून नव्या भविष्याचा श्रीगणेशा करतोय. विकसित भारताचा संकल्प परिपूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या इमारतीकडे आपण जातोय."
 
नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे -
* हे सेंट्रल हॉल आपल्या भावनांनी भरलंय.
* हा हॉल पूर्वी ग्रंथालयासारखा वापरला जात असे. मग संविधान सभा इथे होऊ लागली.
* इथेच 1947 साली ब्रिटिशांकडून सत्ता आपण मिळवली. त्या प्रक्रियेचा हा हॉल साक्षीदार आहे.
* याच सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा स्वीकार झाला.
* 1952 नंतर जगातल्या जवळपास 41 राष्ट्राध्यक्षांनी या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या खासदारांना संबोधित केलंय.
* राष्ट्रपती महोदयांनी 86 वेळा इथे संबोधन केलं गेलंय.
* अनेक संशोधनं, अनेक सुधारणांचा साक्षीदार आपली संसद राहिलीय.
* संयुक्त अधिवेशनाच्या माध्यमातूनही विधेयक मंजूरही केलं गेलंय.
* भारताच्या मोठ्या बदलांमध्ये संसदेची मोठी भूमिका आहे
* आज जम्मू-काश्मीर शांतता आणि विकासाच्या वाटेवर चालतंय
* आज जम्मू-काश्मीरचे लोक पुढे जाण्याची संधी सोडत नाहीत
* संसदेच्या भवनात कितीतरी महत्त्वपूर्ण काम केले गेलेत
* भारत नव्या उत्साहानं पुनर्जागृत होतोय, नव्या उर्जेनं भरलाय, हीच उर्जा, हाच उत्साह देशातल्या कोटी लोकांच्या स्वप्नांना पूर्ण करू शकणार आहे
* माझा विश्वास आहे, देश ज्या दिशेला जातोय, इच्छित परिणाम आवश्यक पूर्ण होईल
 
सेंट्रल हॉलमधून जुन्या आठवणींना उजाळा
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाच्या सुरुवातील भाषण केलं. प्रल्हाद जोशी म्हणाले, "आजपासून आपण संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करणार आहोत. जुन्या इमारतीतलं हे सेंट्रल हॉल ब्रिटिशांकडून भारताकडे सत्तांतराचं साक्षीदार आहे."
 
संसदेची नवी इमारत नव्या विकसित भारताचं प्रतिक आहे, असंही यावेळी प्रल्हाद जोशी म्हणाले.
तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनामुळे भारत वैश्विक शक्ती बनतंय.
 
"संसद कायमच एकतेचं प्रतिक राहिलंय. संसदेच्या मूल्यांचं रक्षण संसद करते. विविध भाषा आणि संस्कृती असूनही आपल्याला राष्ट्र म्हणून संसद एक ठेवते. असंच आपण एकत्रित काम करत राहू," असं पियुष गोयल म्हणाले.
 
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेंनी भाषणाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
 
"संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करताना मी काहीसा भावनिक झालोय. कारण जुन्या इमारतीतल्या अनेक आठवणी आठवतील," असं खर्गे म्हणाले.
 
 
 




















Published By- Priya Dixit