बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (16:13 IST)

पुलवामा हल्ला नरेंद्र मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे- सत्यपाल मलिक

जम्मू-काश्मीरमध्ये 2019 साली घडलेल्या पुलवामा हल्ला प्रकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी अनेक सनसनाटी दावे केले आहेत.
2019 साली काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या (CRPF) ताफ्यावर झालेला हल्ला हा यंत्रणेची निष्क्रियता आणि निष्काळजीपणाचा परिणाम होता, असा आरोप मलिक यांनी केला.
 
भ्रष्टाचाराप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित ‘झीरो टॉलरन्स’ धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मलिक म्हणाले, “पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबद्दल काहीएक अडचण नाही.”
 
द वायर न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कलम 370 हटवणं, भाजप नेते राम माधव या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
सत्यपाल मलिक यांच्या आरोपानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. अनेक जण या मुद्द्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुलाखतीचे व्हीडिओ ट्विट करत आहेत.
 
सध्या ट्विटरवर #CorruptPradhanMantri ट्रेंड करत असून #सत्यानाशी_काँग्रेस हा शब्दही ट्रेंडिंगमध्ये आहे.
 
काँग्रेसने काय म्हटलं?
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. पुलवामा हल्ला आणि 40 शूरांचं हौतात्म्य सरकारच्या चुकीमुळे झालं आहे, असा आरोप काँग्रेसनेही केला.
ते म्हणाले, “नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 शूरांना हौतात्म्य मिळणं हे तुमच्या सरकारच्या चुकीमुळे झालेलं आहे. जर जवानांना एअरक्राफ्ट मिळालं असतं तर दहशतवाद्यांचं षडयंत्र अयशस्वी ठरलं असतं. तुम्हाला त्या या चुकीवर कृती करायची होती. पण तुम्ही ही गोष्ट दाबून ठेवली आणि स्वतःची प्रतिमा वाचवण्यावर भर दिला. पुलवामाच्या मुद्द्यावर सत्यपाल मलिक यांनी बोललेल्या गोष्टी ऐकून देश स्तब्ध झाला आहे.”
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर असं दिसून येतं की मोदीजींना राष्ट्र-हानीपेक्षाही मानहानीची जास्त भीती आहे.”
 
तर, राहुल गांधी यांनी म्हटलं, “पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबद्दल काहीएक अडचण नाही.”
काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनीही ट्विट करून म्हटलं, “मी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची करण थापर यांनी घेतलेली मुलाखत लक्षपूर्वक ऐकली. माननीय राज्यपालांनी केलेली वक्तव्ये खरी असतील, तर हा खूपच त्रासदायक प्रकार आहे. देशाबाहेर या गोष्टींचा प्रचंड मोठा परिणाम दिसून येईल.”
आम आदमी पक्षानेही याविषयी ट्विट केलं, ते म्हणाले, “मोदीजी, जर केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत, तर मग जगात कुणीही प्रामाणिक नाही. सत्यपाल मलिक यांनीही म्हटलं की मोदींना भ्रष्टाचाराबद्दल काहीही अडचण नाही. जो स्वतः भ्रष्टाचारात लिप्त असेल, त्या व्यक्तीला भ्रष्टाचाराची काय अडचण असू शकते?”
सुप्रसिद्ध पत्रकार सागरिका घोष यांनी ट्विट करून लिहिलं, “जे अनेक जण खासगीत बोलत होते, ते जम्मू-काश्मीरचे शेवटचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सार्वजनिकरित्या स्वीकारलं आहे. पुलवामा हल्ला ही सुरक्षेसंदर्भात घोडचूक होती. ज्यामध्ये 40 सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला."
 
खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या, "जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांनी मुलाखतीत एका गोष्टीवरचा पडदा हटवला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं की आरएसएसचा माणूस अदानीसाठी कशा प्रकारे लाच देतो."
 
मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध न झाल्याचा दावा करताना त्या म्हणाल्या की किती काळ भारतीय माध्यमे अशा प्रकारे घाबरून राहतील.
इंडियन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी माध्यमांवर टीका करत म्हटलं, "पुलवामा हल्ल्याचं सत्य जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते सत्यपाल मलिक यांनी उघड केल्यानंतर किती राष्ट्रवादी माध्यमं यावर प्राईम टाईम वादविवाद करत आहेत?
 
सुप्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी राम माधव यांचा उल्लेख करून विचारलं, "जागी आहात? एक गोष्ट विचारयाची आहे, राम माधव यांनी सत्यपाल मलिक यांना मानहानीची नोटीस का पाठवली? या प्रकरणात CBI ने FIR दाखल केलेली असताना त्यांनाच चौकशीसाठी तयार आहे, म्हणून सांगायला हवं होतं. तुम्ही विचारू शकत नसाल, तर आम्ही जाऊ विचारण्यासाठी."
वकील प्रशांत भूषण यांनी म्हटलं, "भयानक, मोदींनी निवडलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोदींसोबतच्या अनुभवावर आधारित एक भयानक मुलाखत."
स्वाती चतुर्वेदींनी म्हटलं, "काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमध्ये थोडंसंही तथ्य असेल तर तुम्ही इतिहासात सर्वात देशद्रोही सरकार चालवत आहात. मला हे ट्विट करतानाही दुःख होत आहे."
स्वीडनच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहणाऱ्या अशोक स्वॅन यांनी या मुलाखतीचा एक भाग ट्वीट करून म्हटलं,
 
"डिसेंबर 2018 मध्ये मी एक भविष्यवाणी केली होती की 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी भारताला पाकिस्तानविरोधात युद्धजन्य स्थितीत घेऊन जातील. निवडणुकीपूर्वी असाच झाला होता पुलवामा."
 
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी प्रशासकीय अधिकारी जवाहर सरकार यांनी ट्विट करून लिहिलं, "मोदींनी स्वतः नेमलेले जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मते, पुलवामा दुर्घटना टाळता येऊ शकली असती. ही एका चुकीमुळे झाली. 2019 ची निवडणूक जिंकण्यासाठी मोदींसाठी या घटनेची मदत झाली. याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी."
 
महाराष्ट्र काँग्रेस सेवादलाने म्हटलं, "सत्यपाल मलिकांनी मोदी सरकारची ही चूक उघड केली आहे. आरडीएक्स आणल्याची माहिती मिळाली होती. तरीही मोदी सरकारने जवानांना रस्ते मार्गाने पाठवलं. या हल्ल्याचा फायदा घेण्यात आला. यामध्ये माध्यमांनीही महत्त्वाची भूमिका बजावली."
 
सत्यपाल मलिक खोटे बोलत आहेत – भाजप
सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळून लावले आहेत.
 
या प्रकरणात भाजप नेत्यांकडून सत्यपाल मलिक यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे.
 
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एकामागून एक ट्विट करून मलिक यांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी मुलाखतीचा तो भाग टाकला, ज्यामध्ये सत्यपाल मलिक म्हणतात की अमित शाह यांच्याबाबत त्यांचा पहिला एक दावा चुकीचा होता. शाह यांनी मोदींबद्दल असं काहीही वक्तव्य केलं नाही, असं ते यामध्ये म्हणतात.
 
यावर मलिक यांच्यावर टीका करताना मालवीय म्हणाले, “जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्वीकारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत गृह मंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दावे खोटे असल्याचं ते म्हणाले. त्यांनी ज्यावेळी ते आरोप लावले होते, तेव्हासुद्धा त्यांना कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं. पण यामुळे आता त्यांच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.”
 
त्यांनी आणखी एक ट्विट करून लिहिलं, “खरं बोलण्यामध्ये एक चांगलं असतं की तुम्हाला तुम्ही गेल्या वेळी काय बोलता होता, हे लक्षात ठेवावं लागत नाही.”
 
काँग्रेससाठी नवे शूरवीर ठरलेल्या सत्यपाल मलिक यांच्याबाबत मी उत्सुक आहे. पण त्यांचं राहुल गांधींबद्दल काय म्हणणं आहे, ते आधी ऐका.
 
ऋषि बागरी नामक एका ट्विटर युजरने लिहिलं, “सत्यपाल मलिक यांची ही मुलाखत बूमरँग ठरली आहे, जेव्हा त्यांनी म्हटलं की पंतप्रधानांच्या मुद्द्यावर त्यांनी अनेक कहाण्या रचलेल्या आहेत.”
दुसऱ्या एका ट्विटमध्ये ते लिहितात, “दरबारी पत्रकारांमध्ये हा व्हीडिओ खूपच पसरला होता. आता ते आपलं वक्तव्य मागे घेतील, की माफी मागतील?”
पत्रकार शिव अरूर म्हणतात, “जे मूर्ख यशवंत सिन्हा यांच्या मागे-पुढे जमलेले होते, आता तेच सत्यपाल मलिक यांच्या आजूबाजूला गर्दी करून जमले आहेत.”
काय म्हणाले सत्यपाल मलिक?
न्यूज पोर्टल द वायरच्या या मुलाखतीत सत्यपाल मलिक करण थापर यांना म्हणाले, 2019 साली काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जो हल्ला झाला त्याला कमकुवत व्यवस्था आणि हयगय कारणीभूत आहे.
त्यांनी यासाठी सीआरपीएफ आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला जबाबदार ठरवलं, त्यावेळेस राजनाथ सिंह देशाचे गृहमंत्री होते.
 
मलिक म्हणाले, सीआरपीएफने जवानांंच्या प्रवासासाठी विमान मागितलं होतं मात्र गृह मंत्रालयाने ती मागणी नाकारली होती.
 
या ताफ्याच्या मार्गावर संरक्षणाची नीट तपासणी केली नव्हती असा आरोपही त्यांनी सरकारवर केला.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले- शांत राहा
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिम कॉर्बेट पार्कमधून फोन केला तेव्हा आपण या मुद्द्यांबद्दल बोललो पण पंतप्रधानांनी मला शांत राहायला सांगितलं असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
 
हीच गोष्ट एनएसए अजित डोभाल यांनीही सांगितल्याचं मलिक म्हणाले.
 
या मुलाखतीत मलिक म्हणाले, तेव्हाच या सरकारला हल्ल्याचं खापर पाकिस्तानवर फोडून त्याचा निवडणुकीत लाभ घेण्याचा हेतू असल्याचं आपल्याला समजलं होतं.
 
मलिक यांनी या हल्ल्याला गुप्तचर यंत्रणांचं अपयशही जबाबदार असल्याचं सांगितलं. पाकिस्तानातून 300 किलो आरडीएक्स एखाद्या ट्रकने येतं आणि ते जम्मू-काश्मीरमध्ये 10 ते 15 दिवस फिरत राहातं तरीही गुप्तचर यंत्रणांना समजलं नाही असा दावा त्यांनी केला.
 
सत्यपाल मलिक यांनी भाजपा नेता राम माधव यांच्यावर केलेला आरोप पुन्हा एकदा केला.
 
ते म्हणाले, राम माधव यांचा एकेदिवशी सकाळी सात वाजता फोन आला आणि पनबिजली योजना आणि रिलायन्सची एक विमा योजनेला मंजुरी दिली तर त्यांना 300 कोटी मिळू शकतात असं ते म्हणाले.
 
हा प्रस्ताव आपण नाकारला आणि अयोग्य काम करणार नाही असं राम माधव यांना सांगितल्याचं मलिक सांगतात.
 
पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत अनभिज्ञ होते असं सांगत त्यांना या राज्याबद्दल चुकीची माहिती मिळते असं सांगितलं. या राज्याचा विशेष दर्जा रद्द करणं ही एक चूक अंसल्याचं मलिक संबोधतात.
 
मलिक यांनी नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारावरील झिरो टॉलरन्स धोरणावर बोलताना पंतप्रधानांना भ्रष्टाचाराची फार काही घृणा वाटत नाही असं म्हटलं आहे.