1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (08:42 IST)

विद्यार्थी सुरक्षेसाठी तीन वेळा हजेरी

यापुढे शाळेत सुरक्षेचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शाळा सुटण्यापूर्वी अशी दिवसातून तीन वेळा हजेरीची नोंद करणे सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. यात राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 
 
शाळांमधील मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आता राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे.
 
बालकांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक गुन्ह्य़ांबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीने तत्काळ विशेष किशोर पोलीस पथक किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षेचा भाग म्हणून सर्व शाळांमध्ये तक्रार पेटीची व्यवस्था करायची आहे. शाळेच्या आवारात, तसेच प्रवेशद्वारावर पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक व कर्मचारी नेमताना त्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांकडून घ्यावे, असे व्यवस्थापनांना सांगण्यात आले आहे.