गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (17:06 IST)

सुधा मुर्तींनी म्हटलं की, मी बाहेर जाताना चमचा सोबत घेऊन जाते; या विधानावरून चर्चा का?

sudha murty
अन्नपदार्थ हे विविध समुदायांना एकत्र आणण्याचं एक माध्यम आहे. पण प्रसिद्ध लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी केलेल्या आहाराविषयीच्या खुलाशाने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
 
ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यापासून सॉफ्टवेअर उद्योगातील दिग्गज नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती सातत्याने चर्चेत येत आहेत. कारण सुनक हे त्यांचे जावई आहेत.
 
72 वर्षीय सुधा मूर्ती यावेळी चर्चेत आल्या त्या एका जेवणाशी संबंधित कार्यक्रमामुळे.
 
"खाने में क्या है?" (दुपारच्या जेवणासाठी/रात्रीच्या जेवणासाठी काय आहे?) या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता.
 
सुधा मूर्ती यांनी बोलण्याच्या ओघात त्यांच्या अनेक सवयींचा उलगडा केला. त्यातून त्या शुद्ध शाकाहारी असल्याचं स्पष्ट झालं. पण त्यांच्या या वक्तव्यांमुळे त्यांचं नाव तीन दिवस ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
सुधा मूर्ती यांनी त्या मुलाखतीत सांगितलं की, "मी शुद्ध शाकाहारी आहे. मी अंडीदेखील खात नाही. परदेशात गेल्यावर मी घरुनच चमचा आणि कुकरदेखील घेऊन जाते. कारण मला काळजी वाटते की, एकच चमचा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी वापरलेला असू शकतो"
 
"शिवाय जेव्हा मी प्रवास करते तेव्हा मी शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जाते. बाहेरचे अन्न पदार्थ खायला मला भीती वाटते, म्हणूनच मी बाहेर जाताना बॅग भरुन अन्नपदार्थ बरोबर घेऊन जाते."
 
"माझे आजी-आजोबा अशा पद्धतीने अन्नपदार्थ घेऊन प्रवासाला जायचे तेव्हा आम्ही त्यांना चिडवायचो. पण आता मीही त्यांच्याप्रमाणे बदलले आहे."
 
जेव्हा त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा सोशल मीडिया दोन गटात विभागलं. अनेकांना त्यांची ही सवय काहीशी खटकली, तर काहींनी सुधा मूर्ती यांची पाठराखण केली.
 
काहींनी त्यांच्या या मुलाखतीवर टीका करताना म्हटलंय की, त्यांना दाखवून द्यायचं आहे की आपण अंडी खाणाऱ्यांपेक्षाही कसे वेगळे आहोत.
 
तर काहीजण म्हणतात की, समाजातील जातिव्यवस्था शाकाहारी अन्न शुद्ध असल्याचं ठरवते. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे 'उच्च जातीच्या' ब्राम्हणी विचारांना चालना देणारं आहे.
 
काही इतिहासकारांच्या मते, देशाच्या काही भागात ब्राह्मण लोक मांस खात असत आणि बरेच जण आजही मांसाहार करतात. पण तरीही शाकाहारी असणं हे 'शुद्धता' या संकल्पनेशी जोडलं गेलं.
 
समाजशास्त्रज्ञ जानकी श्रीनिवासन यांनी ट्विट करत म्हटलंय की, "भारतातील आहार हा जातीव्यवस्थेशी निगडित आहे. व्यक्तिशः ही त्यांच्या सवयीची बाब आहे. पण जातीच्या दृष्टीने बघितले तर ते खूप अवघड आहे."
 
आणखीन एका ट्विटर युजरने ट्विट करताना म्हटलंय की, "शाकाहारी लोकांना SOAP ही संकल्पना माहीत नसावी. त्यातून त्यांच्या मानसिकतेची पातळी दिसून येते. 'शुद्ध आणि अशुद्ध' या संकल्पना निश्चितच ब्राम्हण्यवादी आहेत.
 
काहीजण सुधा मूर्तींचे जावई ऋषी सुनक यांच्या हातातील प्लेटमध्ये मांस असलेले फोटो शेअर करत आहेत.
 
यावर जोरदार टीका झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. असा अंदाज आहे की देशातील सुमारे 20 टक्के लोक फक्त वनस्पती आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करतात.
 
पोलीस अधिकारी अरुण बोथरा लिहितात, "मी मांसाहारी लोकांच्या शेजारी बसून जेवतो. पण, जर तेच चमचे मांसाहारासाठी आणि शाकाहारी अन्नासाठी वापरले जात असतील तर अवघड आहे. गरज नसेल तर मी जेवण करणार नाही. आणि हे तुम्हाला समजत नसेल तर ती तुमची अडचण आहे. त्यांच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. मी सुधा मूर्तींचं समर्थन करतो."
पत्रकार शीला भट्ट म्हणाल्या की, सुधा मूर्ती यांच्यासारखं वागणाऱ्या आणि त्यांना जसं आवडतं तसं राहणाऱ्या बऱ्याच लोकांना त्या ओळखतात.
 
तसेच मांसाहारी भारतीयांमध्येही बरेच लोक आहाराचे नियम आणि परंपरा पाळतात. उदाहरणार्थ, बरेच हिंदू गायीचे मांस खात नाहीत. तसेच मुस्लिम डुकराचे मांस खात नाहीत.
 
फक्त शाकाहारीच नाही तर बरेच मांसाहारी देखील "गाईच्या मांसापासून बनवलेलं फ्रेंच सूप, गायीच्या चरबीपासून बनलेलं जाड कट बेल्जियन फ्राईज खात नाहीत.
 
तर दुसर्‍या एका ट्विटर युजरने लिहिलंय की, मुस्लिमांना जेव्हा माहित नसतं की, मटण हलाल आहे की नाही तेव्हा ते देखील शाकाहारी अन्न खातात.
 
सुधा मूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली नाही
जातिव्यवस्था खोलवर रुजलेल्या भारतामध्ये टीका होणं अजिबात आश्चर्यकारक नाही. कारण हिंदूंमध्ये जातीव्यवस्था मजबूत आहे. या व्यवस्थेत उच्च जातींना वारसाहक्काने विशेष अधिकार मिळाले. यात खालच्या वर्गावर झालेल्या अत्याचाराविरोधात अजूनही तीव्र भावना आहेत.
 
अनेक दशकांपासून जातिभेद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं जात असलं तरी, समाजात आजही खालच्या वर्गातील लोकांसोबत भेदभाव केला जातो.
 
या दशकात शाकाहार हे ही एक हत्यार बनलं आहे. काही हिंदू संघटना गाईचे मांस खाल्लं आणि गायींची अवैध वाहतूक केली असे आरोप करून मुस्लिम आणि दलितांवर हल्ले करत आहेत.
 
पण काही तज्ञांच्या मते, सुधा मूर्ती यांच्या सारख्या लेखिकेने आणि उच्च पदांवर असलेल्यांनी अशा गहन विषयांबद्दल बोलताना अधिक सतर्क राहिलं पाहिजे.
 
सुधा मूर्ती यांच्या वक्तव्यावरून ट्विटरवर जो गदारोळ सुरू आहे त्यावर त्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. जेव्हा त्या एखादं वक्तव्य करतात तेव्हा तो विषय हमखास चर्चेचा विषय ठरतो.
 
मे महिन्यात एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात सुधा मूर्ती म्हणाल्या की, लंडनमधील इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता जेव्हा त्यांनी त्यांचा पत्ता 10 डाउनिंग स्ट्रीट असल्याचं सांगितलं होतं. त्या त्याची मजा घेत आहेत, असं त्या अधिकाऱ्याला वाटलं. त्यावेळीही त्या सोशल मीडियावर खूप ट्रोल झाल्या होत्या.
 
त्यानंतर महिन्याभरात त्यांचं आणखी एक वक्तव्य व्हायरल झालं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, "मी माझ्या पतीला व्यापारी बनवलं, माझी मुलगी अक्षता मूर्तीने तिच्या पतीला पंतप्रधान बनवलं."
 
1981 मध्ये सुधा मूर्ती यांनी त्यांचा पतीला आयटी कंपनी सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांचे कर्ज दिले होते.
 

















Published By- Priya Dixit