सुमारे 80 हजार कोटी रुपयांचा सुरत-चेन्नई हायवे बनणार
सुमारे 80 हजार कोटी रुपयांचा सुरत-चेन्नई हायवे बनणार असून नाशिक जिल्ह्यात दहा हजार कोटींचे काम होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात तब्बल 422 किलोमीटर लांबीचा होईल त्यात 182 किलोमीटर मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नितीन गडकरी नाशिक दौऱ्यावर होते. इगतपुरी येथे त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या 226 किलोमीटर लांबीच्या 1830 कोटी रुपयांच्या लोकार्पण आणि कोनशीला कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी हे इगतपुरी तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध प्रकल्पाची माहिती दिली. महाराष्ट्रात मंत्री असल्याचा आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. त्याकाळी केलेल्या नाशिक-मुंबई हायवे बांधण्याचा त्यांचा निर्णयाबद्दल त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सात कामांचे भूमिपूजन केले.
80 हजार कोटी रुपयांचा सुरत-चेन्नई हायवे होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या हायवेमुळे मोठी क्रांती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प तब्बल 80 हजार कोटी रुपयांचा आहे. यात दहा हजार कोटी रुपयांचे काम नाशिक जिल्ह्यातून होणार असून महाराष्ट्रातून 422 किलोमीटर हायवेचा मार्ग होईल व यात 182 किलोमीटर मार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले, हा महामार्ग नाशिक, आमदाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातून जाणार असून नाशिक ते सोलापूर अंतर दीड ते पावणे दोन तासात कव्हर होऊ शकते. यामुळे नाशिककरांना मोठा फायदा होणार आहे.
या प्रकल्पासाठी 42 हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन होईल. या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळतील असे त्यांनी या ठिकाणी सांगितले.
या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातून 995 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तसेच ग्रामीण भागात देखील रोजगार निर्मिती होईल. या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई येथील ट्रॅफिक आणि प्रदूषण दोन्ही कमी होण्यास मदत होणार आहे. उत्तर भारतातील लोक थेट नाशिकमधून दक्षिणेत जाऊ शकतात. असे विविध फायदे या महामार्गाच्या माध्यमातून होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor