बिहारची राजधानी पाटनामध्ये कडाक्याच्या थंडीत राजकीय तापमानाचा पार अचानक वाढला आहे. इंडिया आघाडी आणि बिहारमधील महाआघाडीपासून नितीश कुमार फारकत घेणार आहेत का?
बुधवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहताना नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती.
नितीशकुमार यांनी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी, ते म्हणाले होते की कर्पूरी ठाकूर यांनी कधीच त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही पण आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढे रेटण्यात धन्यता मानत आहेत.
नितीश कुमार यांची टिप्पणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर असल्याचं बोललं जातंय. भाजप सरकारने दोन दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता आणि त्याबद्दल नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.
यानंतर गुरुवारी सकाळी बातमी आली की, 30 जानेवारीला बिहारच्या पूर्णियामध्ये येणाऱ्या राहुल गांधींच्या रॅलीमध्ये नितीश कुमार सहभागी होणार नाहीत.
भारत जोडो न्याय यात्रेचा भाग म्हणून राहुल गांधी पूर्णियाला जाणार आहेत. याआधी जदयूने नितीशकुमार हे राजदच्या नेत्यांसोबत यात्रेला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले होते.
जदयूचे ज्येष्ठ नेते विजय कुमार चौधरी हे नितीश कुमार यात्रेत सहभागी होणार नसल्याबाबत म्हणाले की, “महाआघाडीचे सर्व नेते यात्रेला उपस्थित असलेच पाहिजेत असं नाही."
राजकीय घडामोडीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करणार का याविषयीच्या चर्चांना उधाण आलंय.
जदयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी म्हटलंय की, नितीश कुमार यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर कर्पूरी ठाकूर यांची प्रशंसा केलेली, त्यांचं वक्तव्य लालू प्रसाद यादव यांना उद्देशून नव्हतं.
नितीश कुमार एनडीएमध्ये परतण्याच्या चर्चांबाबत बिहारमधील भाजप नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, ही पक्षासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे बिहारमधील भाजपचं नैतिक मनोबल वाढण्यास मदत होईलच, शिवाय इंडिया आघाडी राष्ट्रीय स्तरावर कमकुवत होईल.
बिहार भाजपच्या नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर द हिंदूला सांगितलं की, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तरच भाजप त्यांना सोबत घेईल. अशा परिस्थितीत विधानसभा बरखास्त करणं हा एकच पर्याय असू शकतो.
के सी त्यागी यांनी लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनाही लहान मुलांनी मोठ्यांच्या चर्चेपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
संबंधांमध्ये दरी
नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी केली तर नोव्हेंबर 2005 नंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा पाचवा यू-टर्न असेल. ऑगस्ट 2022 मध्येच नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली होती आणि राजदशी हातमिळवणी केली होती.
नितीश कुमार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांबाबत जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के सी त्यागी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की,
"आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की इंडिया आघाडीमध्ये जे काही सुरू आहे ते योग्य नाही. ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत त्या जागा काँग्रेसने मागता कामा नयेत."
एक जानेवारीला माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि नववर्षाच्या निमित्तसुद्धा लालू आणि नितीश यांच्यात संवादाचा अभाव दिसून आला होता.
यापूर्वी 29 डिसेंबर रोजी दिल्लीतील जदयूच्या बैठकीत पक्षाध्यक्ष लल्लन सिंह यांनी राजीनामा दिला होता आणि नितीश कुमार पक्षाचे अध्यक्ष झाले.
भाजप नेते सुशील मोदी यांनी त्यावेळी दावा केलेला की, 'लल्लन सिंह याची लालूंसोबत जवळीक वाढल्याने त्यांना हटवण्यात आलं आहे.'
नितीश कुमार यांच्या घराणेशाहीवरील टिप्पणीनंतर राजद नेते लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्वीट करून टोमणा मारला होता. नंतर त्यांनी ट्वीट काढून टाकलं असलं तरी ते ट्वीट नितीश कुमार यांना उद्देशून असल्याचं मानलं जात आहे.
त्याचवेळी राजदने म्हटलंय की, घराणेशाहीमुळे कोणताही नेता आपल्या मुलांना राजकारणात पुढे नेऊ शकत नाही, उलट लोकच अशा नेत्याला प्रोत्साहन देतात.
दिल्ली ते पाटण्यापर्यंत बैठका आणि सभांची जंत्री
या घडामोडींदरम्यान बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी गुरुवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत पोहोचले.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीत बिहार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.
अमित शहा यांच्याशी भेट घेतल्यानंतर बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी म्हणाले की, "2024 ची लोकसभा निवडणूक कशी लढवायची याचा आढावा बैठकीत घेण्यात आला."
तत्पूर्वी, बिहार सरकारमधील महत्त्वाचे भागीदार राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजद नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांची भेट घेतली होती.
मात्र, राजदचे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, अशा बैठका अनेकदा होतात आणि बिहार सरकारला कोणताही धोका नाही, नितीश सरकार चांगलं काम करत आहे.
बिहार सरकारमधील कथित वादाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांनी म्हटलंय की, नितीश कुमार अनेकदा लालू प्रसाद यादव यांना धमकावत असतात की, "मी माझ्या माहेरी निघून जाईन, पण त्यांच्यासाठी माहेरच्या घराचा दरवाजा कधीच बंद केला गेलाय."
गिरीराज सिंह यांचा इशारा नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत हातमिळवणी करण्याकडे असल्याचं बोललं जातंय.
गिरीराज सिंह यांचा दावा
अलीकडेच लालू प्रसाद यादव आणि गिरीराज सिंह यांची हवाई प्रवासात भेट झालेली.
या भेटीनंतर गिरीराज सिंह यांनी दावा केला होता की, लालू प्रसाद यादव यांना त्यांचा मुलगा तेजस्वी यादवला बिहारचा मुख्यमंत्री बनवायचंय.
या राजकीय गोंधळादरम्यान बिहार सरकारमधील अर्थमंत्री आणि जदयूचे आमदार विजय चौधरी यांनीही माध्यमांशी बोलताना राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलंय. बिहार भाजप नेत्यांच्या अमित शाह यांची भेट घेण्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, बैठका घेणं हे पक्षांचं काम आहे.
त्याचवेळी, जदयूचे आणखी एक आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या सूत्रानुसार संपूर्ण देशभरात मागास आणि अतिमागास लोकांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मागणीबद्दल ट्विट केलं आहे.
साहजिकच अशाप्रकारची मागणी करणं हा भाजप आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्याच्या राजकारणाचा भाग आहे.
दरम्यान, बिहार विधानसभेतील जागांचं गणित लक्षात घेतल्यास तिथे 79 जागांसह राजद सर्वांत मोठा पक्ष आहे, तर भाजप 78 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जदयूकडे 45 जागा आहेत, म्हणजेच 243 जागांच्या विधानसभेत ज्या कुणाला जदयूचा पाठिंबा मिळेल त्यांनाच सरकार स्थापन करता येईल.
त्याचवेळी बिहार भाजपने राज्यातील दारूबंदीवरून पुन्हा एकदा नितीश कुमार सरकारवर निशाणा साधला आहे.
म्हणजेच बिहारमधील महाआघाडी सरकारमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला नितीश कुमार यांच्याबाबत भाजप मवाळ भूमिका घेताना दिसत नाही आणि दुसरीकडे महाआघाडीचे नेतेसुद्धा हे मान्य करत नाहीत की सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही.
भाजपची रणनीती
बिहार भाजपचं एक ट्विट आणि गिरीराज सिंह यांचं वक्तव्य आणखीन एक संकेत देतात.
किंबहुना, जदयू भाजपसोबत नसला तरी राजद आणि जदयूने स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक फायदा भाजपला होऊ शकतो, असंही जाणकारांचं मत आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी भाजप आणि जदयू वेगळे होते, त्या निवडणुकीत भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या, तर त्यांच्या मित्रपक्षांची बेरीज केली तर एनडीएला 31 जागा मिळाल्या होत्या.
यामध्ये 6 जागा एलजेपी आणि 3 जागा उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष आरएलएसपीला मिळाल्या होत्या.
2019 च्या गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बिहारमधील 40 लोकसभा जागांपैकी 39 जागा जिंकल्या असल्या, तरी यापैकी 17 जागा भाजपने, 16 जदयू आणि 6 एलजेपीने जिंकल्या होत्या.
पण नंतर ऑगस्ट 2022 मध्ये जदयू हा एनडीएपासून विभक्त झाला होता.
राहुल गांधींची यात्रा 29 तारखेला बिहारला पोहोचणार
काँग्रेसने आपल्या प्रादेशिक मित्रपक्षांना आपापल्या राज्यात निवडणूक लढायला दिली पाहिजे, जेणेकरून ते पूर्ण ताकदीनिशी भाजपशी मुकाबला करू शकतील, असा सल्लाही काही तज्ज्ञांनी दिलाय.
त्याचबरोबर भाजपसोबत थेट लढत असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही काँग्रेसला दिला जातोय.
बिहारच्या राजकारणातील या गदारोळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा 29 जानेवारी रोजी बिहारमध्ये दाखल होणार आहे.
बातम्यांनुसार, 29 आणि 30 जानेवारीला ईडीने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना 'लँड फॉर जॉब' प्रकरणी चौकशीसाठी दिल्लीला येण्याचा समन्स पाठवला आहे.
अशा परिस्थितीत बिहारमधील राहुल गांधींच्या रॅलीबाबत जदयू कोणती भूमिका घेणार यावरूनही बिहारमधील विरोधी आघाडीची दिशा स्पष्ट होणार आहे.
Published By- Priya Dixit