रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (13:49 IST)

यास चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलं

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं यास चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी धडकलं. त्यानंतर या परिसरात 130 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाने थैमान घातलं आहे.
 
वादळामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने लोकांना स्थलांतर करावं लागत काही ठिकाणी पडझड झाल्याचंही सांगण्यात येतं. वादळाचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं कार्य NDRF कडून सुरू आहे.
 
दुपारपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, नंतर वादळाचा वेग मंदावेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे.
 
वादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या समुद्र किनारी भागात काल रात्रीपासूनच येथील हवामान बदलल्याचं पाहायला मिळत होतं. जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला.
 
दुपारपर्यंत चालणार यास चक्रीवादळाचा कहर
यास चक्रीवादळाने भूहद्दीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला सकाळी नऊच्या सुमारास सुरुवात झाली. पुढील तीन ते चार तास ही प्रक्रिया सुरू राहील. दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण चक्रीवादळ भूहद्दीत दाखल होईल, अशी माहिती ओडिशाचे विशेष पुनर्वसन आयुक्त पी. के. जेना यांनी दिली आहे.
 
धम्र आणि बालासोर जिल्ह्यांमधून हे वादळ पुढे पुढे सरकत राहणार आहे. दुपारपर्यंत ते पूर्णपणे बालासोर जिल्ह्यात दाखल होईल. त्यानंतर ते मयुरभंज जिल्ह्यात प्रवेश करेल.
 
यादरम्यान यास चक्रीवादळात 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. मयूरभंज जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वादळाचा वेग किंचित कमी होऊन 100 ते 110 प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यानंतर मात्र वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होत जाणार आहे, अशी माहिती जेना यांनी दिली.
 
बालासोर आणि भद्रकजवळच्या धामरा जवळून हे चक्रीवादळ सरकणार आहे. चक्रीवादळामुळे ताशी 130 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
 
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आधीच देण्यात आल्या आहेत.
 
चक्रीवादळामुळे समुद्रात दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात. मेदिनीपूरसह पश्चिम बंगालमधील दक्षिणेकडील जिल्हे तसंच ओडिशाच्या बालासोर आणि भद्रक या भागांमध्ये पाणी साचू शकतं, असा इशारा हवामान खात्याने दिला होता.