मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 20 जुलै 2022 (08:27 IST)

नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी आलेल्या युवकाला अटक

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानच्या युवकाला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी श्रीगंगानगर जिल्ह्यातील हिंदूमलकोट येथील सीमा चौकीपाशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आलं. 
 
गस्तीवरील पथकाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. त्याच्याकडे 11 इंच लांबीचा सुरा, धार्मिक पुस्तके, कपडे, खाद्यपदार्थ, वाळू अशा वस्तू सापडल्या. आपले नाव रिझवान अश्रफ असे असून उत्तर पंजाबमधील मंडी बहाउद्दीन शहराचा रहिवासी असल्याचा दावा तो करतो.
 
प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही राज्याच्या पोलिसांनी अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. यामुळे शर्मा यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी 10 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. जे बी. पारडीवाला यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.