2023 हे नववर्ष सुरू होऊन अगदी काही तासच उलटले असतील, तिकडे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका मुलीचा दुर्दैवी अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका चारचाकी गाडीला धडक बसल्यानंतर, या मुलीचं शरीर त्या गाडीत अडकलं.
त्यानंतर गाडीसोबत ती काही किलोमीटर अंतर फरफटत गेली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पीडितेला दिल्लीतील मंगोलपुरी येथील एसजीएम रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
बाह्य दिल्लीचे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या तरुणीच्या शरीराचा पार्श्व भाग आणि डोक्याच्या मागचा भाग वाईटरीत्या घासला गेलाय." मात्र सोशल मीडियावर हे बलात्कार आणि हत्येचं प्रकरण असल्याचे दावे करण्यात आले.
हे दावे फेटाळून लावताना डीसीपी हरेंद्र सिंह म्हणाले की, "हे केवळ अपघाताचं प्रकरण असून पीडितेवर लैंगिक अत्याचार झालेला नाही."
एएनआय या वृत्तसंस्थेने डीसीपी सिंह यांच्या हवाल्याने म्हटलंय की, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने पीडितेच्या आईच्या हवाल्याने म्हटलंय की, "त्यांनी अजूनपर्यंत त्यांच्या मुलीचा मृतदेह पाहिलेला नाही."
मृतदेहाच्या पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी एक टीम नेमली आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणाची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस दिली आहे.
प्रकरणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
वृत्तसंस्था एएनआयने पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं की, रविवारी म्हणजेच 1 जानेवारीला पहाटे 3.24 वाजता कांजवाला पोलिस स्टेशन मध्ये फोन आला. एक चारचाकी गाडी मृतदेहाला फरफटत नेत असल्याची माहिती या फोनद्वारे पोलिसांना मिळाली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पहाटे 4 वाजून 11 मिनिटांनी आणखीन एक फोन आला. यात एका मुलीचा मृतदेह रस्त्यावर पडलाय असं सांगण्यात आलं."
रोहिणी जिल्हा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या तरुणीला मंगोलपुरीतील एसजीएम रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण सुलतानपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत येते. तिथल्या एसएचओंना स्कूटीला अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. पहाटे 3 वाजून 53 मिनिटांनी या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
डीसीपी हरेंद्र सिंह यांनी कोणती माहिती दिली?
दिल्लीचे डीसीपी हरेंद्र सिंह म्हणाले, "ही गंभीर बाब आहे. हा एक दुर्दैवी अपघात होता."
गाडी थांबवून पीडितेला मदत करण्याऐवजी त्यांनी तिला तसंच फरफटत नेलं.
कदाचित आपल्या गाडीखाली कोणी व्यक्ती आलीय याची त्यांना माहिती नसेल. पण जेव्हा त्यांना हे समजलं तेव्हा त्यांनी आपली चूक सुधारायला हवी होती. पण त्यांनी प्रयत्नच केला नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
आरोपींच्या गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावली होती. त्यावेळी ते नशेत होते का? याचा तपास केला जाईल.
आरोपींनी जी माहिती दिलीय तिला सायंटिफिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारावर तपासून पाहिलं जाईल.
या घटनेचे कोणतेही प्रत्यक्षदर्शी नव्हते. पोलिसांनी ज्या व्यक्तीने माहिती दिली तो त्या गाडीच्या मागे होता. आणि त्याने पाहिल्याप्रमाणे गाडीच्या मागे कोणीतरी फरफटत होतं.
आम्हाला गाडीचा नंबर मिळाला होता. पण ज्याच्या नावावर गाडी आहे तो या गाडीत नव्हता, त्याचे मित्र गाडी घेऊन गेले होते. आम्ही पाच जणांच्या घरी पोहोचून त्यांना अटक केली.
खूप अंतर पुढं गेल्यावर आरोपींना समजलं की, गाडीत कोणीतरी अडकलंय. त्यांनी गाडी थोडी मागे घेतली, मृतदेह बाजूला झाला आणि ते लोक निघून गेले.
सोशल मीडियावर असलेल्या फोटोंमध्ये कपडे दिसत आहेत. पायात आलेल्या घोळदार कपड्यांमुळे तरुणी गाडीत अडकली असल्याचं दिसतंय.
सोशल मीडियावर जे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जातायत, त्यात शरीराचा फ्रंट (शरीराचा पुढचा भाग) दाखवला जातोय. आमच्याकडे बॅक पोर्शनचे (शरीराचा मागील भाग), डोक्याच्या मागच्या भागाचे फोटो आहेत.
हे अपघाताचं प्रकरण आहे. कोणतीही चौकशी न करता सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
डीसीपी सिंह म्हणाले की, पीडितेचे पोस्टमार्टम सुरू आहे. यासाठी मेडिकल बोर्ड तयार केलं आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काय म्हणणं?
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
त्या म्हणाल्या की, "मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या मुलांनी दिल्लीच्या रस्त्यावर कित्येक किलोमीटर मुलीचा मृतदेह फरफटत नेला. तिचा मृतदेह रस्त्यावर नग्न अवस्थेत आढळून आलाय.
हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. दिल्ली पोलिसांना समन्स जारी केले आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणती सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती?"
पीडितेच्या आईचं काय म्हणणं आहे?
एएनआय या वृत्तसंस्थेने पीडितेच्या आईचा हवाला देत म्हटलंय की, त्यांनी अजूनपर्यंत मुलीचा मृतदेह पाहिलेला नाही.
त्या म्हणाल्या की "माझी मुलगी माझं सर्वस्व होती. शनिवारी संध्याकाळी ती पंजाबी बागेत कामावर गेली होती."
त्यांनी पुढे सांगितलं की, "ती सायंकाळी 5.30 च्या सुमारास घरातून निघाली होती. रात्री 10 वाजता घरी येऊ असंही ती जाताना सांगून गेली होती. मात्र सकाळी तर तिचा अपघात झाल्याची माहिती मला मिळाली."
Published By- Priya Dixit