बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (17:24 IST)

ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात कोणकोणत्या 8 मूर्ती आहेत? त्यांची नेमकी पूजा कशी होते?

-अनंत झणाणे
1993 सालापर्यंत पंडित सोमनाथ व्यास हे ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेला असलेल्या तळघरातील देवांच्या मूर्तींची पूजा करत होते. हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी आपल्या याचिकांमध्ये याला व्यास यांचे तळघर असं म्हटलंय.
 
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथे न्यायालयाने नियुक्त केलेल्या रिसिव्हर (जिल्हा दंडाधिकारी) तर्फे पूजा आणि राग-भोग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
 
न्यायालयाने त्यासाठी एका आठवड्याची मुदत दिलेली, मात्र प्रशासनाचा आदेश आल्यानंतर काही तासांतच रात्री उशिरा पूजेला सुरूवात करण्यात आली.
 
बीबीसीने काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट आणि वाराणसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून तळघर उघडून पूजेला कशाप्रकारे सुरू करण्यात आली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
पूजेला रात्रीच सुरूवात का करण्यात आली?
वाराणसी प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तळघर उघडणं आणि पूजा करणं हे एक मोठं आव्हान होतं.
 
न्यायालयाच्या आदेशानुसार या तळघरातून सापडलेल्या मूर्तींचीच पूजा करायची होती, असं प्रशासनाचं म्हणणं होतं.
 
त्यामुळे प्रशासनाला सर्वप्रथम या सर्व मूर्ती तिजोरीतून बाहेर काढायच्या होत्या. या मूर्तींची ओळख पटवणं गरजेचं असल्याने एएसआयच्या अहवालात छापलेल्या मूर्तींच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला.
 
यापूर्वी काढलेल्या छायाचित्रांवरून या मूर्तींची ओळख पटवण्यासाठी दोन ते तीन तास लागले. प्रशासनातर्फे 8 मूर्तींची ओळख पटवल्यानंतर त्या पूजेसाठी तिजोरीतून तळघरात नेण्यात आल्या.
 
काशी विश्वनाथ कॉरिडोअरच्या आवारात एकावेळेला साधारणपणे 20 ते 30 हजार भाविक असतात. कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सर्वप्रथम ती जागा रिकामी करावी लागली, त्यामुळे त्यातही थोडा वेळ गेला.
 
वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी काशी विश्वनाथ मंदिराचं व्यवस्थापन आणि जवळच्या चेतगंज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवल्यानंतर हे निश्चित करण्यात आलं की रात्री उशीरापर्यंत प्रशासन कुंपण तोडण्याची कारवाई करेल आणि पूजा करण्यात येईल.
 
फक्त प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या लोकांची उपस्थिती
आत जाण्याचा रस्ता तयार करण्यासाठी लोखंडाचं कुंपण काढून तिथे एक लोखंडी दरवाजा बसवण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं.
 
पूर्वीप्रमाणे आत्ताही सर्वांसाठी रस्ता खुला करण्यात आलेला नाही, मात्र कायमस्वरूपी कुंपणाच्या ऐवजी आता तिथे दरवाजा लावण्यात आला असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
 
तळघरात अंधार असल्याने तिथे विजेची व्यवस्थाही करण्यात आली. तळघर बंद असल्याने तिथे ओलसर वाचावरण होतं.
 
एखादं ठिकाण दीर्घकाळ बंद राहिल्यास तिथे पूजा करण्याचे कोणते नियम आहेत, याबाबतही प्रशासनाने धार्मिक विधी करणाऱ्या जाणकारांकडून सल्ला घेतला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काशी मंदिराचे पुजारी ओमप्रकाश मिश्रा यांनी पूजेला सुरुवात केली.
 
ज्यावेळी तळघरात प्रवेश करण्यात आला आणि पूजा करण्यात आली तेव्हा सोमनाथ व्यास त्यांच्या कुटुंबातील तसेच या प्रकरणातील एकही याचिकाकर्ता तिथे उपस्थित नव्हता, असं वाराणसी प्रशासनाचं म्हणणं आहे.
 
कोणत्या मूर्तींची पूजा करण्यात आली?
या तळघरात सापडलेल्या एकूण 8 मूर्तींची पूजा करण्यात आली.
 
यामूर्ती आधीपासूनच सरकारी तिजोरीत ठेवण्यात आल्या होत्या. पूजेसाठी त्या तळघरात नेण्यात आल्या.
 
यात 2 अपूर्ण शिवलिंगाच्या आकृत्या, भगवान विष्णूची एक मूर्ती, हनुमानाच्या दोन मूर्ती , गणपतीची एक मूर्ती, राम लिहिलेला छोटासा एक दगड आणि गंगेतल्या मगरीची एक प्रतिकृती आहे.
 
यातील एकही मूर्ती सुस्थितीत नसून सर्व भग्नावस्थेतील आहेत, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
 
तळघराला दरवाजा नव्हता
वाराणसी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, कुठलाही दरवाजा नसल्यामुळे तळघराच्या आत जाणं अतिशय सोपं काम होतं.
 
2022 मध्ये न्यायालयाच्या आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या वेळी याच तळघराचं बारकाईने सर्वेक्षण करण्यात आलेलं.
 
हे सर्वेक्षण त्याच आयोगातर्फे करण्यात आलं होतं ज्यामध्ये हिंदूंनी मशिदीच्या वुजूखान्यात शिवलिंग असल्याचा दावा केला होता.
 
एएसआयने सर्वेक्षण सुरू केल्यानंतर या तळघरातील माती काढण्यास सुरुवात केली. सध्या तळघरात खांबदेखील पडलेले आहेत.
 
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 1993 मध्ये इथे पूजा केली जात असे. मात्र हे तळघर कुंपणाच्या आत गेल्यानंतर या तळघराच्या दोन चाव्या होत्या.
 
एक चावी सोमनाथ व्यास यांच्याकडे आणि दुसरी जिल्हा प्रशासनाकडे असायची.
 
सोमनाथ व्यास वर्षातून एकदा रामायणाचं आयोजन करायचे, त्यासाठी ते प्रशासनाची स्वतंत्र परवानगी घेत, खांब काढून त्याठिकाणी मंडप उभारला जात असे आणि रामायणानंतर पुन्हा तो काढून ठेवला जाई.
 
सोमनाथ व्यास यांच्या निधनानंतर या सर्व गोष्टी थांबल्या, चाव्यासुद्धा गहाळ झाल्या आणि नंतर तळघराचा लाकडी दरवाजाही तुटला.
 
तळघर 35 ते 40 फूट लांब आणि 25 ते 30 फूट रुंद असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. यामध्ये पाच कक्ष आहेत.
 
एक कक्ष मातीने भरलेला असून तीन कक्ष उघडे आहेत. पाचव्या कक्षाला भिंत असून तो बंद आहे. एएसआयच्या म्हणणण्यानुसार तिथे एक विहीर आहे. मशिदीच्या दक्षिणेला तीन तळघरं होती असं गृहीत धरलं तर हे मधलं तळघर असायला हवं.
 
फक्त एकाच पुजाऱ्याला आत जाण्याची परवानगी
फक्त एकाच पुजाऱ्याला तळघरात जाण्याची परवानगी आहे.
 
स्वच्छता आणि दिवे लावण्यासाठी सुरुवातीला लोक आत गेले, मात्र रात्री मूर्ती ठेवून आरती केल्यानंतर एकच पुजारी आत जाऊन पूजा करतोय.
 
कुंपण कापून बसवलेला दरवाजा पहाटे 3:30 वाजताच्या पहिल्या आरतीच्या वेळी उघडतो आणि रात्री 10:30 वाजताच्या आरतीनंतर बंद करण्यात येईल.
 
ज्या भाविकांना दर्शन घ्यायचंय ते फक्त एकाच गेटमधून दर्शन घेऊ शकतात आणि गेटमधून आतमध्ये जाण्याची त्यांना परवानगी नाही.
 
पूजा कशी केली जातेय?
हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे सीईओ विश्वभूषण मिश्रा यांच्याशी संवाद साधला.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या पद्धतीने काशी विश्वनाथ मंदिरात पूजेचा कार्यक्रम पार पडतो, ट्रस्टकडून त्याच धर्तीवर तळघरातही पूजा केली जाते.
 
पहाटे अडीच ते साडेतीन या वेळेत तळघरात मंगला आरती केली जाते. त्यानंतर सकाळी 11 ते 1 या वेळेत भोग आरती असते. यामध्ये देवाला भोजन दिलं जातं. संध्याकाळी चार वाजता आणखीन एक आरती केली जाते.
 
सायंकाळी 7 ते 8 यावेळेत सप्तर्षी आरती केली जाते आणि रात्री 10 ते 11:30 यावेळेत शेवटची आरती पार पडते.
 
न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरात राग-भोगाची व्यवस्था करणं गरजेचं आहे.
 
याबाबत स्पष्टीकरण देताना मंदिर ट्रस्टचे सीईओ विश्व भूषण मिश्रा सांगतात, "राग-भोग म्हणजे कायदेशीररीत्या देवतेची व्याख्या अल्पवयीन मूल अशी करण्यात आली आहे, त्यानुसार नैवेद्य दाखवला जातो, पोषाख बदलला जातो, श्रृंगार करण्यात येतो आणि त्यांची सेवा केली जाते."