मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (21:33 IST)

अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तानविषयी त्याचं मत काय आहे आणि पंजाबमध्ये नेमकं काय होईल?

amrutpal singh
अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहे. पण हा अमृतपाल कोण आहे?
 
स्वतःला धर्मप्रचारक म्हणवून घेणाऱ्या अमृतपाल सिंगला अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि त्याचे फुटिरतावादी विचार यांमुळे पंजाबचं वातावरण ढवळून निघालं आहे.
 
आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता.
 
त्यानंतर अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्याचे पडसाद पंजाबमध्ये उमटू लागले.
 
अगदी लंडनमध्येही अमृतपाल सिंगच्या कथित समर्थकांनी भारतीय दुतावासाबाहेर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही झाली.
 
पण हे सगळं ज्याच्यावरून सुरू झालं, त्या अमृतपालच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि सुरुवातीच्या दिवसांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.
 
अमृतपाल सिंग कोण आहे?
अमृतपालनं माध्यमांना दिलेल्या मुलाखतींत आपण मूळचे अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचे रहिवसी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे.
 
लिंक्डईन या वेबसाईटवरील प्रोफाईलनुसार अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं.
 
2012 साली अमृतपालसिंग दुबईला राहायला गेल्याचं सांगितलं जातं. तिथे तो आपल्या कुटुंबाच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात उतरला.
 
10 फेब्रुवारी 2023 रोजी बाबा बकालामध्ये त्याचं लग्न झालं, पण ड्रग्स माफियांकडून धोका असल्याचं सांगत त्यानं आपली पत्नी आणि कुटुंबियांविषयी गोपनीयता राखली आहे.
 
सोशल मीडियामुळे प्रसिद्धी
पंजाब विद्यापीठाचे प्राध्यापक खालिद मोहम्मद सांगतात की अमृतपाल सिंगच्या लोकप्रियतेत सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे, कारण या माध्यमातून त्याला अगदी सहज मोठ्या समुदायापर्यंत पोहोचता आलं.
 
अमृतपालची लोकप्रियता तशी आधी सोशल मीडियापुरती मर्यादित होती, जिथे तो शीख धर्मियांचं ऐक्य आणि स्वतंत्र राज्य म्हणजे खलिस्तानच्या स्थापनेविषयी आपली मतं मांडायचा. अमृतपाल पंजाबमधील ड्रग्सची समस्या, खलिस्तानची मागणी आणि शीख धर्मियांशी निगडीत मुद्द्यांवरही उघडपणे लिहायचा.
 
2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली.
 
शेतकरी आंदोलनादरम्यानच लाल किल्ल्यावर हल्ल्याप्रकरणी अटक झालेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू प्रकाशझोतात आला होता.
 
जामिनावर सुटका झाल्यावर सिद्धूनं वारिस पंजाब दे ही संघटना स्थापन केली, जी उजव्या विचारसरणीच्या खलिस्तानी चळवळीचंही समर्थन करते. अमृतपाल या संघटनेच्या संपर्कात आला.
 
फेब्रुवारी 2022 मध्ये दीप सिद्धूचं कार अपघातात निधन झाल्यावर संघटनेची जबाबदारी अमृतपालवर आली.
 
जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारखा वेश
ऑगस्ट 2022 मध्ये अमृतपाल दुबईहून भारतात आला, तेव्हा त्याचा वेश बदलला होता आणि त्यानं शिखांची धार्मिक वस्त्रं, अस्त्रं परिधान करण्यास सुरुवात केली.
 
डोक्यावर निळी पगडी, लांब दाढी, हातात कडा आणि कंबरेला कृपाण हा वेश धारण करतो, जो 1980च्या दशकातील खलिस्तानी कट्टरतावादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेंची आठवण करून देणारा आहे.
 
इतकंच नाही तर 29 सप्टेंबर 2022 रोजी अमृतपालनं वारिस पंजाब देचं नेतृत्त्व अधिकृतरित्या स्वीकारलं, तो समारंभही भिंद्रनावालेंच्या गावात, रोडे इथेच आयोजित करण्यात आला होता.
 
1984 साली भारतीय सैन्याच्या वादग्रस्त ऑपरेशन ब्लू स्टारदरम्यान भिंद्रनवालेंना मारण्यात आलंं होतं.
 
त्यांचीच कट्टर मतं अमृतपाल अनेकदा आपल्या भाषणांत मांडताना दिसतो.
 
अमृतपालच्या मते नदीच्या पाणीवाटपाचा माग, ते ड्रग्सचं व्यसन ते पंजाबी संस्कृतीची पिछेहाट अशा पंजाबच्या समस्यांवर शिखांचं स्वतंत्र राष्ट्र हे एकच उत्तर आहे.
 
काही दिवसांपूर्वी बीबीसीच्या अरविंद छाबडा यांना दिलेल्या मुलाखतीतही अमृतपालनं ‘खलिस्तान जिंदाबाद म्हणणं कायदेशीर आहे; आमचा भारतीय निवडणुकीवर विश्वास नाही; ब्रिटिशांनी इथली राज्यघटना बनवली होती, 1947 नंतर त्यात फार कमी बदल झाले आहेत. ’ अशी विधानं केली होती.
 
नोव्हेंबर 2022 मध्ये अमृतपालनं राज्यभर एक धार्मिक यात्रा काढली आणि शिखांना अमृत संस्कार म्हणजे धर्माची अधिकृत दीक्षा घेण्याचं आवाहन केलं, तसंच ड्रग्सचं सेवन सोडण्याचं आणि जातीभेद तसंच हुंड्यासाख्या प्रथा बंद करण्यासही सांगितलं.
 
पण महिनाभरानं वारिस पंजाब दे संघटनेचे अनुयायी एका गुरुद्वारातील खुर्च्या तोडण्यामुळे चर्चेत आले. शिखांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबच्या सान्निध्यात लोकांनी जमिनीवरच बसायला हवं, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
 
फेब्रुवारी 2023 मध्ये पंजाबच्या अजनालामध्ये या संघटनेच्या एका सदस्याला एका व्यक्तीचं अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
 
23 फेब्रुवारीला त्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी अमृतपालच्या शेकडो समर्थकांनी पोलिस स्टेशनवरच हल्ला केला.
 
यात काही पोलीसही जखमी झाले, आणि त्यांना दबावाखाली त्या आरोपीला सोडण्याचं आश्वासनही द्यावं लागलं.
 
त्यानंतर पोलिसांनी दावा केला की अजनालामध्ये गर्दीवर नियंत्रण मिळवणं त्यांना अशक्य बनलं होतं, कारण आंदोलक गुरू ग्रंथ साहिबची प्रत एखाद्या ढालीसारखी वापरत होते.
 
या सगळ्या प्रकारापासून अमृतपालच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आणि परिणामी पंजाबमध्ये अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं. पण अमृतपालसिंगला एवढा पाठिंबा का मिळतो आहे?
 
अमृतपाल सिंगची लोकप्रियता काय सांगते?
1980 च्या दशकभरात पंजाबमध्ये बंडखोरी माजली, तेव्हा त्यात हजारो जणांना प्राण गमवावे लागले होते. कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात काही मोठ्या नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेला तर पोलीसांच्या कारवायांमध्ये अनेक शीख तरूण मारले गेले.
 
पंजाबच्या त्या जखमा अजून ओल्याच आहेत.
 
"सध्या पंजाबमध्ये जे होताना दिसतंय, ते विचार करायला भाग पाडतं, की आपण पुन्हा त्याच काळ्या दिवसांकडे परततो आहोत का? वातावरणात खरंच एक प्रकारची भीती आहे," असं निरीक्षण पंजाब पोलीसांचे माजी महासंचालक शशी कांत यांनी नोंदवलं आहे.
 
तर गुरु नानक देव विद्यापीठाचे प्राध्यापक परमिंदर सिंग सांगतात की “पंजाबमध्ये सध्या अनेक तरुण असे आहेत ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली नाही, ते फार शिकलेले नाहीत, त्यांना काही काम मिळत नाही किंवा परदेशात जाणंही शक्य नाही. असे अनेक तरूण वैतागून धार्मिक कट्टरतावादाकडे झुकले असण्याची शक्यता आहे”
 
पंजाब विद्यापीठातले राज्यशास्त्राचे प्रध्यापक आशुतोष यांना अमृतपाल सिंगचा एवढ्या कमी वयात असा अचानक झालेला उदय हे एक गूढ वाटतं.
 
ते म्हणतात, “केंद्रीय पातळीवर सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे समर्थक हिंदू राष्ट्राची मागणी उचलून धरत असताना काही शीख धर्मियांना अशा नेतृत्त्वाची गरज जाणवत असावी, जे त्यांच्या मागण्या, समस्या आणि अन्यायाकडेही लक्ष वेधू शकेल.”
 
इथे एक गोष्ट विसरता येत नाही, ती म्हणजे पंजाबमध्ये वर्षभरापूर्वी म्हणजे मार्च 2022 मध्येच आम आदमी पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं होतं आणि भाजपला 2 तर शिरोमणी अकाली दलला तीनच जागा मिळाल्या होत्या.
 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात धार्मिक सलोखा कायम असल्याचा दावा केला आहे. अमृतपाल सिंगच्या समर्थकांना उद्देशून ते म्हणाले आहेत की “केवळ एक हजार लोक अख्ख्या पंजाबचं प्रतिनिधित्व करत नाहीत.”
 
तर काहींच्या मते अमृतपालला अवाजवी प्रसिद्धी मिळते आहे.
 
प्राध्यापक परमिंदर सिंग सांगतात, की “पंजाबमधला फुटिरतावाद पूर्णपणे संपलेला नाही, पण 1990 पासून त्याची लोकप्रियता कमी झाली आहे. राज्यातले सगळेच जण अमृतपालसारख्या लोकांचं समर्थन करत नाहीत आणि हिंसक आदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे.”
 
अमृतपाल सिंगला झपाट्यानं मिळालेली प्रसिद्धी या राज्याच्या रक्तरंजित इतिहासाची आठवण करून देते.
 
अनेक दशकांच्या असंतोषानंतर पंजाब शांत झालं होतं, लोकांचं जीवन पूर्वपदावर आलं होतं. पण हे राज्य आता पुन्हा अस्थिरतेकडे जात असल्याची भीती काहीजण व्यक्त करू लागले आहेत.
 
1980 च्या दशकात पंजाब पोलीसांत भरती झालेल्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी याआधी पोलीस स्टेशन्सवर अनेकदा हल्ले झालेले पाहिले आहेत. “पण यावेळी पहिल्यांदाच पोलीस एवढे अगतिक झालेले दिसले,“ असं ते सांगतात.
 
गेले अनेक महिने अमृतपाल सिंग स्वसंरक्षणाच्या नावाखाली हातात तलवारी आणि बंदुका घेऊन पंजाबमध्ये फिरत होता, पण त्याच्याविरोधात एकही केस रजिस्टर झाली नाही, याकडेही प्राध्यापक परमिंदर सिंग लक्ष वेधतात.
 
ते म्हणतात, "ही वाटचाल घातक दिशेनं सुरू आहे आणि अशी परिस्थिती ओढवणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर पंजाबला एका गंभीर संकटाला सामोरं जावं लागू शकेल.”
Published By -Smita Joshi