शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शुक्रवार, 3 जुलै 2015 (10:16 IST)

अबब...खासदारांना हवा दुप्पट ‘पगार’!

खासदारांच्या वेतन आणि दैनंदिन भत्त्यांमध्ये दुप्पटीने वाढ करण्याची शिफारस संसदीय समितीने केल्याने गदारोळ सुरु झाला आहे. माजी खासदारांच्या निवृत्तीवेतनात ७५ टक्के वाढ तर त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍यालाही सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खासदार योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली होती.

या समितीने आठ शिफारशी केल्या आहेत. खासदारांना सध्या असलेले ५० हजारांचे वेतन दुप्पट करण्यासह माजी खासदारांना दिले जाणारे निवृत्तीवेतन सध्याच्या २० हजारांवरून ३५ हजार करण्याचा प्रस्तावही समितीने ठेवला आहे.

अधिवेशनकाळात सभागृहातील कामकाजाला हजेरी लावण्यासाठी खासदारांना दररोज २ हजार रुपये भत्ता दिला जातो. तो दुप्पट करण्याची शिफारस समितीने केली. माजी खासदारांना रेल्वे प्रवासासाठी प्रथम श्रेणीचे तिकीट दिले जात असले तरी त्यांच्या पत्नींना दुसर्‍या  श्रेणीचे तिकीट दिले जात असल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. माजी खासदारांसोबत प्रवास करणार्‍या साथीदारालाही प्रथम श्रेणीचेच तिकीट द्यावे. त्यांना वषार्तून पाचवेळा विमानाच्या इकॉनॉमी श्रेणीतून प्रवासाची संधी दिली जावी, असे समितीने सुचविले आहे.

विद्यमान खासदारांना विमानाच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून वर्षभरात ३६ वेळा मोफत प्रवासाची सुविधा असते. खासदारांना मंत्रिमंडळ सचिवाच्या वरचे स्थान असल्यामुळे त्याप्रमाणे सुविधा दिल्या जाव्यात. खासदारांच्या विवाहित मुलांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जावा, असेही समितीने स्पष्ट केले आहे. या समितीने काही शिफारशी बैठकीचे इतिवृत्त म्हणून यापूर्वीच संसदीय कार्य मंत्रालयाला सादर केल्या आहेत.