शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (12:25 IST)

आमिरच्या देश सोडण्याच्या मुद्दयावर कोणी काय म्हटले....

देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नी किरणने देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असे विधान करणार्‍या अभिनेता आमिर खानला घेरण्याचा प्रयत्न सुरू असून आमिरच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आज हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, पाटणा आणि अलाहाबादमध्येही आमिरविरोधात निदर्शने करण्यात आली असून दिल्लीत त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
राहुल गांधी यांच्याकडून समर्थन
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी असहिष्णुतेबाबत अभिनेता आमिर खानने केलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर   अकाउंटवरून समर्थन करणारे तीन ट्विट करण्यात आले आहेत. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. सरकारच्या कारभारावर आक्षेप घेणार्‍या प्रत्येकाला देशद्रोही ठरवण्यापेक्षा समस्येच्या मुळाशी जा. लोकांमध्ये जाऊन त्यांना नेमके काय खटकते हे जाणून घ्या. एखादा प्रश्न सोडवण्याची ही आदर्श पद्धत आहे, असा टोला या ट्विटमधून लगावण्यात आला आहे.
 
मी कट्टर मुस्लिम असहिष्णुतेचा सामना केलाय : रेहमान 
गोव्याची राजधानी पणजीमध्ये आयोजित 46 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये (IFFI) ए.आर.रहेमान उपस्थित होता. काही महिन्यांपूर्वी आपण देखील आमिर खान प्रमाणे देशातील असहिष्णुतेचा सामना केल्याचे रहेमानने यावेळी सांगितले. मुंबईतील रजा अकादमीद्वारा जाहीर करण्‍यात आलेल्या एका फतव्याचा संदर्भ देताना रहेमानने वरील वक्तव्य केले आहे. इराणी सिनेमा 'मोहम्मदः मेसेंजर ऑफ गॉड'ला म्युझिक दिल्यामुळे रजा अकादमीने रहेमानविरोधात फतवा जारी केला होता. इराणमधील हा सर्वात महागडा सिनेमा होता. 253 कोटी रुपये या सिनेमाचे बजेट होते.
 
आमिर खानचा प्रत्येक शब्द खरा आहे. मला त्याचे कौतुक वाटते. भारतीय जनता पक्षाने आता मौन सोडावे.
अरविंद केजरीवाल
 
जगातील लोक जे बोलत आहेत, भारतातील लोक जे बोलत आहेत तेच एक अभिनेता भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत बोलला आहे. आमिरला काँग्रेसचा माणूस म्हणून संबोधणार नाहीत अशी आशा वाटते.
अभिषेक सिंघवी 
 
प्रिय आमिर, भारत सोडून तुझी पत्नी कोणत्या देशात जाऊन राहणार आहे, हे तिला विचारलेस का? या देशानेच तुला आमिर खान बनवलेय हे तू तुझ्या पत्नीला सांगितलेस का?
अनुपम खेर
 
आमिर खान लढवय्या माणूस आहे. त्याने देश सोडून जाण्याची भाषा करण्याऐवजी परिस्थिती बदलण्यासाठी लढले पाहिजे. एखादे संकट आले म्हणून खरा देशभक्त मातृभूमी सोडून पळत नाही.
परेश रावल
 
जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेमध्ये भारत हा अधिक सहिष्णू देश आहे. आणि काही लोक जर या देशात समाधानी नसतील; तर ते कुठल्या देशात जाणार आहेत, हेदेखील सांगावे.
रामगोपाल वर्मा 
 
मोदी हे पंतप्रधान होऊ नयेत, असे ज्यांना वाटत होते, त्यांची आता हे सरकार पडावे अशी इच्छा आहे. मात्र राजकारण करुन ते या देशाची लाज घालवत आहेत.
रविना टंडन