शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुवाहाटी (आसाम) , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (14:14 IST)

आसामच्या माजी डीजीपीची आत्महत्या

शारदा चिटफंड 
कोटय़वधींच्या शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरे गेलेले आसामचे माजी पोलीस महासंचालक (माजी डीजीपी) शंकर बरुआ यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. बरुआ यांनी स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शंकर बरुआ यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांची नव्वद वर्षाची आई घरातच दुसर्‍या खोलीत होती.
 
सीबीआय चौकशी झाल्यानंतर शंकर बरुआ यांना अस्वस्थ वाटू लागले. तब्येत बिघडल्यामुळे ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. जरा बरे वाटू लागल्यामुळे घरी आलेल्या बरुआ यांनी आपल्या खोलीत कोणी नसल्याचे पाहून आत्महत्या केली.
 
चिटफंड घोटाळ्यात पश्चिम बंगाल आणि आसाममधील काही घरांवर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. आसाममध्ये बरुआ यांच्या घरावरही सीबीआयने छापा टाकला होता. नंतर बरुआ यांच्या स्टेट बँकेतील खात्याच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात आली होती.
 
याआधी सीबीआयने चिटफंड घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालचे माजी पोलीस महासंचालक रजत मजुमदार यांना अटक केली. आतापर्यंत केलेल्या तपासाआधारे सीबीआयने शारदा चिटफंड घोटाळ्यात पश्चिम बंगालमध्ये चार आणि आसाममध्ये 44 गुन्हे दाखल केले आहेत.
 
शारदा चिटफंड घोटाळा
 
शारदा चिटफंड योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला विशिष्ट मुदतीअंती गुंतवलेल्या पैशांच्या 40 टक्के अतिरिक्त रकमेच्या रुपात परतावा दिला जात होता.