1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कोहिनूर हिरा परत आणण्यास भारत सरकारकडून माघार

नवी‍ दिल्ली- ग्रेट ब्रिटनहून कोहिनूर हिरा परत आणण्याच्या मोहिमेतून भारत सरकारने हात मागे घेल्याचे समोर आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला माहिती अधिकारातून विचारण्यात आलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. सध्या भारत सरकारकडे कोहिनूर हिरा परत आणण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही असे विभागाने म्हटले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना विभागाकडून सांगण्यात आले की, संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार स्वांतत्र्यप्राप्तीपूर्वी ज्या वस्तू विदेशामध्ये गेल्या आहेत, त्या परत आणणे शक्य नाही.
 
विभागाचे अधिक्षण पुरातत्त्वविद सुनंदा श्रीवास्तव यांनी हे उत्तर दिले आहे. पुरातत्त्व आणि बहूमुल्य वस्तू अधिनियम 1972 नुसार कोहिनूर हिरा भारतामध्ये परत आणण्याबाबत कोणतीही कारवाई करणे अशक्य आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोहिनूर हिरा परत आणण्यात यावी अशी मोठय़ा वर्गाकडून मागणी करण्यात येत होती.
 
भारत सरकारच्या वतीने इंग्लडहून कोहिनूर परत आणण्याबाबत दोन वेळा अधिकृतरित्या प्रयत्न करण्यात आले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तात्काळ 1947 मध्ये पहिल्यांदा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱयांदा 1953 मध्ये प्रयत्न करण्यात आला. मात्र दोन्ही वेळा इंग्लडकडून भारताचा दावा फेटाळण्यात आला. कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी भारत सरकार कोणते प्रयत्न करत आहे यासंदर्भात राजीव कुमार खरे यांनी 5 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यातून चौकशी केली होती. यानंतर त्यांनी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे याबद्दल विचारणा केली होती.