शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पाकवर कठोर कारवाईचे संकेत

नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील उरीतील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्लच्या पाश्र्वभूमीवर मोदी सरकार पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची पावले उचलत असल्याचे संकेत मिळत आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी जोर धरत असून वाढत्या दबावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली.

उरीतील दहशतवादी हल्लच्या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये गृहमंत्री, संरक्षणमंत्री, सैन्यप्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय गटबाजीत मुत्सद्दीपणे पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी मोदींनी परवानगी दिली होती.
 
दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे. या बैठकीत पाकिस्तानवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
 
उरीतील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. तर 30 हून अधिक जवान जखमी झाले आहे. पठाणकोटपेक्षाही उरीतील दहशतवादी हल्ला हा मोठा मानला जात आहे. यापूर्वी सायंकाळी उरी परिसरातील शोधकार्याची माहिती देताना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम असल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी म्हटले आहे.
 
हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याचे सांगत उरी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे संकेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिले.