शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 27 मार्च 2015 (10:41 IST)

भूषण-यादव जोडीला पक्षातून काढणसाठी केजरीहट्ट

आम आदमी पक्षाचे नेतृत्व आणि पक्षांतर्गत लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ‘आप’चे संस्थापक नेते अँड. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे भूषण-यादव जोडीच्या हकालपट्टीसाठी अडून बसले असून त्या दोघांकडून राजीनामा मागण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
 
‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीच्या झालेल्या बैठकीत भूषण-यादव यांच्यावरच चर्चा झाली. यादव-भूषण यांचा गट अजूनही पक्षाचे नेतृत्व बदलण्याच्या मताचा आहे. हे केजरीवालांना खटकत असल्यानेच त्यांना पक्षातून काढण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भात आज संध्याकाळी पुन्हा एक बैठक होणार आहे. यादव-भूषण यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास त्यांना पक्षातून काढण्याचा निर्णय होऊ शकतो,’ असेही सांगितले जाते.
 
प्रशांत भूषण व योगेंद्र यादव हे आम आदमी पक्षाचे ‘थिंक टँक’ समजले जातात. दिल्लीबाहेर पक्षाचा विस्तार करण्यावरून भूषण-यादव जोडीचे केजरीवाल यांच्याशी तीव्र मतभेद झाले होते. केजरीवाल यांनी ‘व्हेटो’चा वापर करत या दोघांचे मत धुडकावून लावले होते. त्यानंतर भूषण-यादव यांनी केजरीवालांच्या एकाधिकारशाहीवर हल्ला चढवला होता. त्याप्रकरणी त्यांना पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून वगळण्यात आले होते. या कारवाईनंतरही भूषण-यादव पक्षातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत आहेत.