शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शिलाँग , सोमवार, 27 जुलै 2015 (22:41 IST)

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन

माजी राष्ट्रपती व भारताचे मिसाइल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान देत असतानाच आज सायंकाळी साडेसहावाजते ते अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.  नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम यांनी शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते. कलाम यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.  
 
आता पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉ. ए. जी. जे. अब्दुल कलाम यांनी देशातील अनेक तरुण मनांना चेतना देण्याचे काम केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले "कलाम सर‘ आयुष्याच्या अखेरच्या क्षणांपर्यंत त्यांचे आवडते विद्यादानाचे काम करत राहीले. राष्ट्रपतीपद भूषविलेल्या या महान शास्त्रज्ञाची ओळख देशातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणूनच कायम राहिली, हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विशेष होय.
 
कलाम यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३१ रामेश्वरम येथील एका खेड्यात झाला होता. एका नावाड्याच्या घरात जन्मलेले कलाम यांनी अविरत मेहनत घेत विज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. भारताच्या मिसाइल कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे कलाम हे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यावर साधेपणामुळे ते ओळखले जात होते. सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जायचे.  कलाम यांचा प्रवास हा तरुण पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांसह भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 
 
कलाम यांचे पार्थिव शिलाँगवरुन दिल्लीत आणले जाणार असून रामेश्वरम या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांनी कलाम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.