शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2015 (11:36 IST)

लान्सनायक मुहम्मद फिरोज खान पाकच्या गोळीबारात शहीद

ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन घरी जाण्याऐवजी मायभूमीच्या रक्षणासाठी सीमेवरची ड्युटी करणारा बिहार रेजिमेंटचा लान्सनायक मुहम्मद फिरोज खान (३१) पाकच्या गोळीबारात शहीद झाला.
 
हैदराबादच्या चारमिनार परिसरात राहणारा फिरोज खान ईद निमित्त सुटी घेऊन घरी जाण्याचा विचार करत होता. याच सुमारास पाकने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार करायचा आणि दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत पाठवायचे हे प्रकार वाढले. भारत-पाक सीमेवर तणाव वाढत असल्याचे पाहून लान्सनायक फिरोज खानने सुटी घेण्याचा विचार मनातून काढून टाकला. डोळ्यात तेल घालून तो मायभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत होता.
 
काल (मंगळवारी) सकाळी सहाच्या सुमारास पाकने बालाकोट, मनकोट, कृष्णा घाटी आणि मेंढरमध्ये हलक्या वजनाची आधुनिक स्वयंचलित शस्त्रे, मॉर्टर यांच्या सहाय्याने भारताच्या सुरक्षा चौक्यांवर पुन्हा हल्ले सुरू केले. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला तरी हा गोळीबार सुरू होता. गोळीबार सुरू असताना दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पाकच्या या हालचाली पाहून फिरोज खान आणि त्याच्या सहका-यांनी पाकला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
 
पंजनी चौकीतून पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते. फिरोज आणि त्याचे पंजनी चौकीतले सहकारी यांच्यामुळे दहशतवाद्यांना भारतात प्रवेश करणेच अशक्य झाले. अखेर पाकिस्तानी रेंजर्सनी पंजनी चौकीवर मॉर्टरचा जोरदार मारा सुरू केला. पाकच्या या हल्ल्यात लान्सनायक फिरोज खान शहीद झाला.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजचा ईदच्या सुटीचा अर्ज मंजूर झाला होता. मात्र सीमेवर तणाव वाढत असल्याचे पाहून रजा मिळाली असूनही फिरोजचने घरी जाण्याऐवजी ड्युटी करणे पसंत केले. परिस्थिती नियंत्रणात असेल तर सहका-यांसह  ईद साजरी करेन पण पाक भारतविरोधी कारवाया करत असताना घरी जाऊन सण साजरा करणार नाही, असे फिरोज म्हणाला होता.