शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (17:25 IST)

संविधान हाच सरकारचा एकमेव धर्मग्रंथ : पंतप्रधान

भारताचे संविधान हाच सरकारचा एकमेव धर्मग्रंथ असून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्या ठरेल, अशा या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५वे जयंती वर्ष आणि संविधान दिन याचे निमित्त साधून आयोजित ‘राज्यघटनेसंबंधी कटिबद्धता’ या विषयावरील विशेष चर्चेच्या उत्तरात मोदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवशाली संविधानाची निर्मिती केली आहे. त्यानंतर गरीब, मजूर, शेतकरी, शिक्षक आणि असंख्य घटकांनी तसेच देशाचे सर्व सरकार आणि पंतप्रधानांनी देशाला समोर नेले आहे. त्यांचे योगदान इच्छा असूनही कुणी नाकारू शकणार नाही. राज्यघटना बदलण्याचा विचार केला जात आहे असा संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याबद्दल कुणी विचारही करू शकत नाही. कारण राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्या ठरेल, असे मोदी म्हणाले. २६ जानेवारी रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. ती परंपरा बनली आहे; मात्र या दिवसाची ताकद २६ नोव्हेंबर या दिवसांत दडली आहे. त्या दिवशी देशाने घटनेचा स्वीकार केला होता. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.