शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: जोधपुर (वृत्तसंस्था) , शुक्रवार, 31 ऑगस्ट 2007 (14:25 IST)

सलमान खानला जामीन मंजूर

काळवीटाच्या शिकार प्रकणी सहा दिवसांपासून अटकेत असलेल्या सलमान खानला राजस्थान उच्च न्यायालयाने एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जा‍मीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर सलमानचे वकील दिपेश मेहता यांनी सलमानच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी 24 ऑक्टोबरला होणार असल्यचे सांगीतले.

हम साथ साथ है चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी राजस्थानात असताना काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या पाच वर्षाच्या शिक्षेवर मागील शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब करण्यात केले होते. यानंतर त्याने शनिवारी आत्मसमर्पण केले. सलमान सहा दिवसांपासून जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

आज सकाळीच सुनावणीस सुरूवात झाली. यावेळी न्यायालयात त्याची बहिण अलविराही उपस्‍थित होती. याच खटल्यात त्यास यापूर्वी सर्वप्रथम 1998 मध्ये दोन दिवस तर 2006 मध्ये तीन दिवस तुरूंगात घालावे लागले होते. उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केल्याने कायदेशीर प्रक्रिया आटोपून सायंकाळी साडेपाच पर्यंत त्याची तुरूंगातून सुटका होवू शकते.

यापूर्वी बुधवारी न्यायाधीश गोपाळ कृष्ण व्यास यांनी या प्रकरणाच्या सुनावणीस नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायाधीश एच. आर. पनवार यांच्यासमोर सुनावणीस आले होते. सलमानच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर आपल्या अशीलाला जामीन मिळावा अशी मागणी केली होती.