मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (11:21 IST)

श्री रेणुका देवीची कथा

रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिध्द आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे. वेगळी प्रचीती आहे. कार्ल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिध्द आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. राजा रेणू (कान्यकुब्ज, प्रसेनजित, प्रेसेन) काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे.
 
राजाराणीला बरेच वर्ष मुल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणुन त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुध्द पंचमीस शुक्रवारी जन्मंली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. (रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते.) ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तीचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्हीं लोकांतून अनेक मान्यंवर मंडळी आली. अनेक राजे-महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नि ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. 
 
रेणुकेला पाच मुल झाली, त्या पाचांची नावे रूमावंत, सुशेषा, वसु, विश्र्वासु आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदिवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला ते अतिशय मादक दृष्य पाहून माता रेणूका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदाग्नि रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्निनी आंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामूळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नि ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या ४ मुलांना केली. चार ही मूले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदाग्नि आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम (राम) तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुष झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यानी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचार शक्ती ऋषीना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पुर्ण केली.
 
मृत बंधू जीवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न-विछीन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले.
रेणुका आपल्या संसारात पुन्ह मग्न झाली. रेणुकेस एक बहिण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदाग्निने पाठविले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषिनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदाग्निनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युध्द करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनुच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खुप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जगदाग्नि ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्निंचा वध केला. नंतर  मेहुणी रेणुकेवर २१ वार केले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृष्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे  प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्दुना माझा पराक्रमी राम एकविस वेळ ही पृथ्वी नि:क्षत्रिय करेल.
 
परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पुर्ण करेन. परशुरामाने कावड करून एकाबाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्हात किनवट तालुक्यात पोहचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत विधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे. हे परशुरामाला पाहवेना तो फार दुखी झाला. त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपणं आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जिवीत झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुख:द प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खुप ऊपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली, नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार  ह्रदयभेदक तो प्रसंग पहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दुर गेला. सहा दिवसांनी माता-पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मुर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मुर्ती स्थापन केली.
आईला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र-अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रविण्य मिळविले. त्याने स्वबळावर सौन्य ऊभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले. त्याचा नित्पात करून इतर समाजद्रोही २० राजांना त्याने पराभुत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचं ही युध्द झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी-तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमि एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात दोन तांदळा आहेत. एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा.
 
माहूर येथील डोगंरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी १२००-१५०० पायऱ्या चढूनवर जावं लागत. गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंन्दुर चर्चीत मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बौठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्रीदत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मुर्ती आहे. बाजूला तिर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई-वडिलांची अंतक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई, तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उंचबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडे-कपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी अख्यायिका आहे.
 
महाभारतात रेणुकेची उत्पती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरुन तिला कामली हे नाव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालिपुराणात सांगीतले आहे.