मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (14:37 IST)

देवीचे शारदीय नवरात्रबद्दल धर्मशास्त्रीय माहिती

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात.  नवरात्र हा अत्यंत महत्वाचा कुलधर्म असून तो सर्वांकडे कटाक्षाने पाळला गेला पाहिजे.
 
आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. 
नवरात्राचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.   
 
अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. राम रावण युद्धातही रावणाच्या वधासाठी रामाने नवरात्र देवीचे पूजन केले होते. 
नवरात्र व्रताचे प्रकार:-
१)प्रतिपदा ते नवमी हे संपूर्ण नवरात्र 
२) प्रतिपदा ते सप्तमी हे सप्तरात्री व्रत 
३) पंचमी ते नवमी हे पंचरात्री व्रत  
४) सप्तमी ते नवमी हे त्रिरात्री व्रत                                                         
नवरात्रीची अंगे:- नवरात्रीची प्रमुख ४ अंगे
१) देवतास्थापन
२) मालाबंधन
३) नंदादीप(अखंड दीप)
 ४) कुमारिकापूजन ही आहेत.
काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत. 
 
नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात. 
नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णुसहस्रनाम वाचावे.

नवरात्रात मालाबंधन करताना (माळ बांधताना)त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी.      कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे, शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.
स्कंद पुराणात तिच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत. 
२ वर्षाची- कुमारी 
३ वर्षाची -त्रिमूर्तीनी
४ वर्षाची -कल्याणी
५ वर्षाची - रोहिणी
६ वर्षाची -काली
७ वर्षाची -चंडिका
८ वर्षाची -शांभवी
९ वर्षाची - दुर्गा
१० वर्षाची-सुभद्रा
कुमारिकापूजनाचे फळ पुढीलप्रमाणे:--
१ कुमारिका पूजन- ऐश्वर्यप्राप्ती
 २ कुमारिका पूजन-- भोग व मोक्ष प्राप्ती
३ कुमारिका पूजन  -- धर्म व अर्थ प्राप्ती 
४ कुमारिका पूजन-- राज्यपदप्राप्ती 
५ कुमारिका पूजन-- विद्या प्राप्ती
६ कुमारिका पूजन-- षट् कर्म सिद्धी
७ कुमारिका पूजन---राज्य प्राप्ती
८ कुमारिका पूजन--संपत्ती
९ कुमारिका पूजन--पृथ्वीचे राज्य मिळते.

नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन.
दुःस्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे.
अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.
 
नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे:-
रविवारी -पायस(खीर) 
सोमवारी -गायीचे तूप
मंगळवारी -केळी 
बुधवारी - लोणी 
गुरुवारी -खडीसाखर 
शुक्रवारी - साखर 
शनिवारी -गायीचे तूप.

नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र /महालक्ष्मी अष्टक/ कनकधारा स्तोत्र /रामरक्षा/ देव्यपराध स्तोत्र /श्रीसूक्त/शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा.
१)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परान्न वर्ज्य करावे)
२) ब्रम्हचर्य पालन 
३) दाढी व कटिंग करू नये
४) गादीवर, पलंगावर न झोपणे.

नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो. इति धर्मशास्त्र निर्णय.