शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 25 सप्टेंबर 2014 (12:10 IST)

महिषासुरमर्दिनी दुर्गामाता

प्राचीन काळापासून भारताच्या सर्व भागात देवी महात्म्यांचे पठण आणि उपासना अखंडपणे श्रद्धेने केली जाते. आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतो. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती ही देवीची मुख्य रूपे असली तरी श्री दुर्गामातेने प्रसंगानुरूप जे नऊ अवतार घेतले त्या मातेच्या रूपांची पूजा करण्याची प्रथा आहे. 
 
दुर्गामातेचे पूजन म्हणजेच स्त्रीशक्तीचे पूजन होय. सृजनतेची, स्त्रीशक्तीची उपासना नवरात्रात केली जाते. प्रत्येक स्त्री ही देवीच्या विविध स्वरुपांपैकी एक रूप आहे. ही संकल्पना नवरात्र उत्सवाच्या मागे आहे. 
 
नवरात्रात दृष्ट प्रवृत्तीवर सुष्ट प्रवृत्तींनी मिळवलेला विजय हेच खरे. दहाव्या दिवशी या विजोत्सवाला दसरा संबोधून तो उत्साहाने साजरा केला जातो. पावित्र्य, उत्साह आणि सत्ककर्माचा विजय हीच या नवरात्रोत्सवाची प्रमुख कल्पना आहे. दुर्गा देवीने केलेल्या पराक्रमांच्या  अनेकविध कथा समाजमनात रूढ आहेत. 
 
महिषासुर नावाचा राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. ऋषीमुनींना व इतर मानवांना त्रास देऊन त्याने सगळीकडे उच्छांद मांडला होता. सर्वजण त्रासून भयभीत झाले होते. त्याच असुरी वृत्तीपुढे सर्वजण हतबल झाले होते. तेव्हा सर्व मानव, ऋषीमुनी, देवीदेवता ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना शरण गेले. तेव्हा या तीन देवांनी आपली शक्ती एकत्रित केली. 
 
त्यातूनच ही महादेवता प्रकट झाली, तीच ही दुर्गामाता होय. या देवांनी तिला आपापली आयुधे-शस्त्रे देऊन सुसज्ज केले. त्या देवीने नऊ दिवस महिषासुराशी अहोरात्र लढा देऊन, युद्ध करून त्याला ठार केले. त्याचप्रमाणे चंड-मुंड, शुंभ-निशुंभ या बलदंड दैत्यांचाही नाश करून त्यांनाही कंठस्नान घालून ह्या दुर्गामातेने सकल जगताला चिंतामुक्त केले. स्त्रिायांनी देवीपासून प्रेरणा घेऊन सामार्थ्यसंपन्न बनले पाहिजे, आत्मसन्मान जपून समाजाचा उत्कर्ष केला पाहिजे, हाच नवरात्राचा खरा संदेश आहे.