शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Updated : बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (14:44 IST)

विनेश फोगाट अपात्रतेमुळे ऑलिंपिकमधून बाहेर, मोदी म्हणाले, 'आम्ही तुझ्या पाठीशी आहोत'

modi in kargil
पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून अपात्र ठरली आहे.
 
मंगळवारी (6 ऑगस्ट) विनेशनं महिलांच्या 50 किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात विनेशनं क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती.
 
मात्र, बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे.
 
स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकाचं वजन दोन्ही दिवशी त्यांच्या वजनश्रेणीतच असणं आवश्यक असतं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "विनेश, तू विजेती आहेस. भारताला तुझा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्थान आहेस. आजचा हा धक्का वेदनादायक आहे. माझा उद्वेग शब्दांत व्यक्त करता येणार नाही. चिकाटी म्हणजे काय, याचं तू उत्तम उदाहरण आहेस. तू कायमच आव्हानांचा नेटाने सामना केला आहेस. अधिक जोमाने परत ये! आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत."
 
ऑलिंपिक महासंघ आणि फोगाट कुटुंबीय काय म्हणाले?
याबाबत भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने (IOA) खंत व्यक्त केली आहे.
 
आयओएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही अत्यंत खेदाने ही बातमी सांगत आहोत की, विनेश फोगाटला महिला कुस्ती स्पर्धेच्या 50 किलो वजनी गटातून अपात्र केलं गेलंय. रात्रभर संघाच्या सर्वोत्तम प्रयत्नानंतरही विनेशचं वजन कमी भरलंय. आज सकाळी तिचं वजन 50 किलोपेक्षा जास्त असल्याचे आढळून आलंय."
 
विनेश फोगाटच्या काकांचा मुलगा रवी किरण याने बीबीसीला सांगितले, "आम्हाला आतापर्यंत इतकंच कळलंय की, विनेश ऑलिंपिकमधून बाहेर पडलीय. याहून अधिक आम्हाला काहीच कळलं नाही. विनेशचा भाऊ तिच्यासोबत पॅरिसमध्ये आहे. त्याचेही अद्याप कुटुंबाशी बोलणे झालेले नाही. कदाचित काही वेळाने त्याच्याशी बोलणं होईल. पण सध्या तरी आमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही."
 
पैलवान महावीर फोगाट म्हणाले की, "मला काहीही बोलायचं नाहीय. संपूर्ण देशाला विनेशकडून सुवर्णपदकाची आशा आहे. नियम तर आहे, मात्र कुणी 50-100 ग्रॅमहून अधिक वजन असेल तरी त्यांना खेळण्यासाठी परवानगी दिली जाते."
 
"मी देशातील लोकांना सांगू इच्छितो की, निराश होऊ नका. एक दिवस ती नक्की पदक घेऊन येईल. मी तिला पुढच्या ऑलिंपिकसाठी तयार करेन," असंही महावीर फोगाट म्हणाले.
 
सखोल चौकशी झाली पाहिजे - अखिलेश यादव
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
 
अखिलेश यादव यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलंय की, "विनेश फोगाटला अंतिम फेरीत खेळता न येण्याच्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काय आहे, हे समोर आलं पाहिजे."
 
वजनाबाबत आधीपासूनच होती चिंता
बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी अभिनव गोयल यांच्याशी बोलताना बजरंग पुनिया यांनी विनेश फोगटच्या वजनाबाबत चिंता व्यक्त केली होती.
 
बजरंग पुनिया म्हणाले होते की, "कोणताही खेळाडू प्रथम सेलिब्रेशन करत नाही. आधी वजन कमी करावे लागते. 50 किलोपेक्षा कमी वजन कमी करणे अवघड असते. मुलांचे वजन लवकर कमी होते. मुलींना हे खूप अवघड असते. मुलींना त्यांचं वजन 50 किलोच्या खाली आणणे कठीण असतं."
 
बजरंग पुनिया यांनी असंही म्हटलं होतं की, "गेल्या सहा महिन्यांपासून विनेश सतत वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होती. थोडंसं पाणी आणि एक-दोन रोटी असंच तिचं जेवण होतं. वजन कमी करणे खूप कठीण असतं."
 
दरम्यान, बजरंग पुनिया असेही म्हणाले होते की, ती (विनेश) तिथे उभी आहे, हेही आमच्यासाठी एकप्रकारे पदक आहे.