बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (11:27 IST)

JEE आणि MH-CET परीक्षा कधी आणि कशा होणार?

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे सर्व लक्ष आता केंद्रीय आणि राज्य प्रवेश परीक्षांकडे आहे. देशभरातील इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणाऱ्या जेईई (जॉईंट एन्ट्रान्स एक्झामिनेशन) मेन परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
जेईई मेन 2021 तिसऱ्या सत्राची परीक्षा 20 ते 25 जुलै 2021 दरम्यान होणार आहे, तर चौथ्या सत्राची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता मात्र केंद्रीय शिक्षण विभागाने जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.
 
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जेईई परीक्षेची पहिली दोन सत्रं पार पडली होती, उर्वरित दोन सत्रांच्या परीक्षा 20 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत.
 
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंदर्भातील घोषणा केली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले.
 
राज्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्रवेश सीईटी परीक्षेच्या माध्यमातून होत असतात. बारावीची परीक्षा रद्द झाल्याने सीईटी सेलकडून परीक्षेची पूर्व-तयारी सुरू आहे. एमएच-सीईटी परीक्षा साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते अशी माहिती सीईटी सेलचे प्रमुख चिंतामण जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
कशी होणार जेईई परीक्षा?
यंदा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी चार संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळतील ते ग्राह्य धरले जाणार आहेत.
 
तिसऱ्या सेशनच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश अर्ज भरला नसल्यास 8 जुलैपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे, तर चौथ्या सेशनसाठी 9 ते 12 जुलै दरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत.
 
jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्जासह इतर सर्व माहिती उपलब्ध आहे.
 
कोरोना आरोग्य संकट पाहता विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.
 
सुरक्षित अंतर पाळता यावे म्हणून यंदा परीक्षा केंद्रांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे.
 
एमएच-सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये?
दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात राज्यात इंजिनिअरिंगचे प्रवेश सुरू होतात. पण गेल्यावर्षी सुद्धा कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सीईटीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात झाली. त्यामुळे इंजिनिअरिंगचे प्रवेश उशिराने सुरू झाले.
 
राज्यपातळीवर होणाऱ्या MH-CET परीक्षेचं नियोजन सीईटी सेलकडून केलं जातं. सध्या सीईटी सेलमध्ये परीक्षेची पूर्व तयारी सुरू आहे. गेल्यावर्षी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली होती. यंदा मात्र परीक्षा ऑनलाई होणार की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
राज्याच्या सीईटी सेलचे प्रमुख चिंतामण जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "यंदा परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन हे आताच सांगता येणार नाही. 15 जुलैपर्यंत सीईटी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आम्ही देत आहोत. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षेसाठी वेळ द्या अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे."
 
सध्याची परिस्थिती पाहता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात एमएच-सीईटी परीक्षा होऊ शकते असंही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
 
MH-CET परीक्षा ही विविध क्षेत्रात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी घेतली जाते. यात इंजिनीअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, कृषी या शाखांचा समावेश आहे. या विषयांच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक क्षेत्राची वेगळी सीईटी घेतली जाते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी साधारण साडेचार लाख विद्यार्थी सीईटी देत असतात.
 
बीई (बॅचलर्स इन इंजिनीअरिंग) आणि बीटेक (बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांसाठी इंजिनिअरिंगच्या जवळपास दीड लाख प्रवेशाच्या जागा आहेत. पण सरकारी आणि नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चुरस असते.
 
राज्यात इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी स्वतंत्र CET परीक्षा होत असली तरी त्यासाठी बारावी बोर्डात किमान 45% गुण असणं आवश्यक आहे. त्यामुळे CET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावी बोर्डाच्या परीक्षांचा निकालही तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हा बारावीचा निकाल, CET आणि JEE या प्रवेश परीक्षांची सांगड शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने घालणार यावर विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंग प्रवेशाचं भवितव्य अवलंबून आहे.