पुण्यात ११ वर्षीय मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार
पुण्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. शिवाजीनगर येथील एका शाळेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील वडगावशेरी भागातील एका शाळेत घुसून दहावीत शिकणार्या मुलीवर चाकूने हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मुलींच्या शाळेत पीडित मुलगी शाळेमध्ये असताना एका ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीने तिला बोलण्यात फसवून शाळेच्या बाथरूम नेले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर आरोपी त्या मुलीस या प्रकाराबाबत "कोणाला काही सांगितले तर बघ," अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
मात्र प्रचंड घाबरलेल्या मुलीने तिच्या मैत्रिणीला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. नंतर तातडीने मुलीच्या आईला आणि पोलिसांना शाळेत बोलावून घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
कुटुंबियांना याबाबत माहिती दिली आणि नंतर संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.