बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (23:45 IST)

पुण्यात रिमोट कंट्रोलव्दारे वीज चोरीचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस, जाणून घ्या प्रकरण

पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका शीतगृहामध्ये चोरुन वीज वापरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चाकण जवळील कुरळीमध्ये एस. एल. अ‍ॅग्रो फुडस् शीतगृहात (घडला आहे. ही वीज चोरी रिमोटद्वारे (Power theft by remote) करण्यात येत होती. महावितरणने (MSEDCL) याचा पर्दाफाश करुन 1 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. मीटरमध्ये वीज वापराची नोंद होऊ नये यासाठी रिमोट बसविल्यानंतर अवघ्या 19 तासांमध्ये ही वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत माहिती अशी की, राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण जवळील कुरुळी (ता. खेड) येथे एस. एल. अ‍ॅग्रो फुडच्या शितगृहासाठी महावितरणकडून उच्चदाब वीज जोडणी (High voltage power supply) देण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण (Pune Rural) चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. एन. भोसले यांनी या वीजजोडणीची वार्षिक पाहणी केली असता त्यांना वीजसंचाच्या मांडणीमध्ये संशय आला.
त्यांच्यासह राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे , उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार ,सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (यांनी वीजयंत्रणेची पाहणी व तपासणी केली.यावेळी वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड  व पंच उपस्थित होते.
 
या तपासणीमध्ये शीतगृहातील वीज यंत्रणेत फेरफार करून दोन इलेक्ट्रॉनिक्स किट बसविल्याचे व त्याआधारे रिमोटद्वारे वीजवापराची नोंद होणार नाही अशी तांत्रिक व्यवस्था केल्याचे आढळून आले. वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आल्यानंतर पंचनामा करण्यात आला व दोन इलेक्ट्रॉनिक्स किट व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
वीजचोरी उघडकीस येण्यापूर्वी 19 तासांच्या कालावधीमध्ये रिमोटद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये 1 लाख 410 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135, 138 अन्वये गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.