1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2024 (13:40 IST)

पुण्यात समोश्यामध्ये कंडोम निघाल्यानंतर आता बर्फात मेलेला उंदीर सापडला

जेव्हा आपण कडाक्याच्या उन्हात बाहेर पडतो तेव्हा रस किंवा लस्सीमध्ये बर्फाचे तुकडे घालून हे पेय पिणे सामान्य आहे. पण ही बातमी वाचल्यावर तुम्ही बाहेरील बर्फापासून दूर राहणे पसंत कराल. ही बातमी बर्फाच्या लादीत मृत उंदीर सापडल्याची आहे. होय, पिंपरी-चिंचवडमध्ये समोश्यामध्ये कंडोम आणि गुटख्या निघाल्यानंतर आता पुण्यात उंदरांसह बर्फाचे तुकडे असल्याची चर्चा आहे.
 
हे प्रकरण पुण्यातील जुन्नर शहरातील आहे. एक मृत उंदीर बर्फात गोठलेला आढळला. शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सशिवाय ज्यूस आणि इतर पेये विकणाऱ्यांनाही कारखान्यातील बर्फाचा पुरवठा केला जातो.
 
पुण्यातील जुन्नर शहरातील बर्फ बनवणाऱ्या कारखान्यातून आणलेल्या बर्फाच्या लादीत मृत उंदीर आढळून आल्याचा आरोप आहे. इंडिया टुडेत दिलेल्या वृत्तानुसार, या कारखान्यातील बर्फाची विक्री करणाऱ्या विक्रेत्याला बर्फाच्या लादीत मृत उंदीर सापडला होता. विक्रेते या कारखान्यातून हॉटेल आणि रेस्टॉरंट तसेच ज्यूस, मिल्क शेक, लस्सी या शीतपेयांची विक्री करणाऱ्यांना बर्फाचा पुरवठा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा कारखान्यात बर्फ विकणाऱ्या माणसाने गोठलेला उंदीर पाहिला तेव्हा त्याने आणि इतरांनी त्याचा फोटो काढला आणि व्हिडिओ बनवला.
 
बर्फाच्या तुकड्यात गोठलेल्या मृत उंदराचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कारखान्याच्या स्वच्छतेवर आणि पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
या घटनेनंतर बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. एक दिवसापूर्वी पिंपरी-चिंचवड, पुणे येथून एका कॅन्टीनच्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड सापडल्याची बातमी आली होती. या कॅन्टीनमधून एका ऑटोमोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जेवणाचा पुरवठा केला जातो. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.