रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (11:13 IST)

अखेर घरफोडीचे शतक करणारा सराईत चोरटा पकडला

पुण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याने केलेले घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणत तब्बल साडेनऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय. शहरातील बंद फ्लॅटची पाहणी करून तो घरफोड्या करत होता. त्याच्यावर आतापर्यंत शंभरहून अधिक गुन्हे दाखल आहेत. रमेश महादेव कुंभार (वय 43, रा. काल्हेर, त. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी,  शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना 2016साली सहकार नगर परिसरात झालेल्या घरफोड्यातील आरोपी रमेश हा त्याच्या राहत्या घरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे या घरफोडी बाबत चौकशी केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
 
त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारे चार गुन्हे केल्याचे सांगितले. त्याच्याकडून या गुन्ह्यातील 9 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आता त्याच्या साथीदारांची माहिती काढली जात असून, त्यांना अटक केल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.