शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (08:08 IST)

पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस, नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचले होते. दरम्यान पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे रात्रभर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पहाटे पाणी ओसरल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात येतेय. 
 
पुणे शहराला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे शहारातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी भरलं होतं. त्यामुळे इथल्या रस्त्याला नदीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. या परिसरात रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह इतका होता की रस्त्यावर उभ्या अनेक गाड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवर देखील पावसाचं पाणी साचले होते. यावेळी रस्त्यावर उभ्या दुचाकी पाण्यात वाहून गेल्या. 
 
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ३ हजार ४२० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यानंतर परिस्थितीनुसार हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. पानशेत धरणातून दोन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदी काठच्या रहिवाश्यांना सतर्कतेच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.