मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:01 IST)

IT ने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न आणले उघडकीस

पुणे प्राप्तीकर विभागाने मुंबईतील दोन बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती संस्थांच्या कार्यालयांवर छापे टाकून जप्तीची कारवाई केली. ७ ऑक्टोबर रोजी शोध मोहीमेला सुरुवात झाली आणि मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमधील सुमारे ७० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. या कारवाईत मिळालेल्या पुराव्यांमध्ये प्रथमदर्शनी अनेक बेहिशेबी आणि बेनामी व्यवहार उघड झाले आहेत. आक्षेपार्ह कागदपत्रे, दोन समूहांचे सुमारे १८४ कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्नाचे पुरावे सापडले आहेत.
 
शोध कारवाईमुळे या व्यावसायिक गटांनी विविध कंपन्यांचे जाळे निर्माण करून व्यवहार केल्याचे आढळून आले. जे प्रथमदर्शनी संशयास्पद आहेत. निधीच्याप्रवाहाचे प्राथमिक विश्लेषण सूचित करते की बोगस शेअर प्रीमियम, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, अस्तित्वात नसलेल्या वादातून लवाद सौदे, यासारख्या विविध संशयास्पद मार्गाने बेहिशेबी निधी जमवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाच्या सहभागातून हा निधीचा ओघ आल्याचे आढळून आले आहे. संशयास्पद पद्धतीने जमवण्यात आलेल्या या निधीचा उपयोग विविध मालमत्तांच्या अधिग्रहणासाठी केला गेला आहे. यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय इमारत, दिल्लीतील आलिशान परिसरातील फ्लॅट, गोव्यातील रिसॉर्ट, महाराष्ट्रातील शेतजमिनी आणि साखर कारखान्यांमध्ये गुंतवणूक यांचा समावेश आहे. या मालमत्तांचेमूल्य सुमारे १७० कोटी रुपये आहे. २.१३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्तकरण्यात आले आहेत.