सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (15:53 IST)

20 वर्षीय तरुणाचा खून, 17 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरीत 20 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पहाटे तीनच्या सुमारास राही अपार्टमेंट, पिंपरीगाव याठिकाणी हा प्रकार घडला. अक्षय अनिल काशीद (वय 20, रा. पवार नगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
याप्रकरणी 28 वर्षीय महिलेनं पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कृष्णा बाळू पारधे उर्फ बॉक्सर, बाळ्या, तौसीफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपिल टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय वेद, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, जतिन टाक, खुबचंद मंगतानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराच्या बेडरुममध्ये पती व मुलीसह झोपले होते तर पाठीमागील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा कृष्णा बाळू पारधे व त्याची पत्नी सिमरण झोपले होते.फ्लॅटचा समोरील दरवाजा कोणीतरी वाजू लागले. त्यामुळे फिर्यादी यांनी दरवाजा उघडला तेव्हा अक्षय अनिल काशीद हा दरवाजामध्ये उभा होता.
 
फिर्यादीने अक्षयला ‘तु इतक्या रात्रीचा इथं कशाला आला’, अशी विचारणा केली. अक्षयने फिर्यादी यांना बेडरुम समोर कोणाच्या चपल्या आहेत, असे विचारत त्यांना बाहेर बोलवण्यास सांगितले व फिर्यादीला शिवीगाळ केली.
 
आरडाओरडा ऐकून बेडरुमच्या आत झोपलेला फिर्यादीच्या मामाचा मुलगा आरोपी कृष्णा पारधे बाहेर आला‌. आरोपी कृष्णाने अक्षयला ‘तु कोण आहेस व तु इथे काय करतोस’, अशी विचारणा केली. फिर्यादी महिलेनं हा अक्षय असून माझ्या सोबत लग्न करणार आहे. तु त्याला काही बोलु नकोस’, असे सांगितले. आरोपी कृष्णाने अक्षयला शिवीगाळ करुन हाताने मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी कृष्णा त्याच्या पत्नीला सोडवण्यासाठी घरी गेला व सोबत आरोपी बाळ्या व तौसीफ यांना घेऊन आला.
 
त्यानंतर टेरेसवर असलेल्या अक्षयला तीनही आरोपींनी मारहाण केली. यावेळी अक्षयने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन पोलीसांना फोन करून ‘मला पोलीस मदत पाहीजे’ असे, सांगितले. मात्र, आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावला. अक्षय जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडा ओरडा करीत जिन्यावरुन खाली पळत असताना अपार्टमेंन्टमधील लोक दरवाज्याच्या बाहेर आले. आरोपींनी हातातील लाकडी दांडके उंचावून ‘आमच्या मध्ये कुणी पडले तर त्याला जिवंत सोडणार नाही, आम्ही खुबचंद मंगतानीची माणसं आहोत’, अशी धमकी दिली.
 
त्यानंतर आरोपींनी अक्षयला मारहाण केली व टेरेसवरुन खाली फेकून देत त्याठिकाणावरुन पळ काढला. अक्षयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिसाळ करीत आहेत.