शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (22:52 IST)

आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

आयकर विभागाने  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या निकटवर्तीयांच्या आणि कारखाना संचालक घरावर छापे टाकले. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. तसेच आयकर विभागाने केलेल्या कारवाईबाबत म्हणाले, आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत. त्यांना बदनाम करण्यात येत आहे. उमपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीच कशाचीच कागदपत्रे दडवली नसल्याचे जयंत पाटील  यांनी सांगितले. ते पुण्यात बोलत होते.
 
पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दगडूशेट गणपतीची आरती झाली. मंदिर उघड्यात आले आहेत, हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये, महाराष्ट्र सुरक्षित रहावा हीच प्रार्थना केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
 
जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करत आहे.भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी , सीबीआय  इन्कमटॅक्स  येत.भाजपने राष्ट्रवादीचा एवढा धसका घेतलाय का ? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे.यापूर्वी छगन भुजबळ  यांना असाच त्रास देण्यात आला. त्यांनाही न्याय मिळाला असे पाटील यांनी म्हटले.
 
या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही. इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवी होती. परंतु धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.