शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (15:44 IST)

पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग पुणे- मुंबई महामार्गावर ढासळला; कंत्राटदारांवर कारवाई

पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर सुरू असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुना पुणे मुंबई महामार्गावर ढासळला. या प्रकरणात कंत्राटदारावर कारवाई केली जाणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
 
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यातच मेट्रो स्टेशनच्या कामांनी देखील वेग घेतला आहे. रविवारी (दि. 1) पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर सुरू असलेल्या पीसीएमसी मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग जुना पुणे मुंबई महामार्गावर ढासळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
 
जुना पुणे मुंबई महामार्ग हा व्यस्त रस्ता आहे. या मार्गावरून सतत वाहनांची रांग सुरू असते. मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचा काही भाग थेट रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी मोठी दुर्घटना टळली असल्याचे म्हटले जात आहे.
 
महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे म्हणाले, पीसीएमसी मेट्रो स्टेशन जवळ घडलेल्या घटनेची चौकशी महामेट्रोचा सेफ्टी विभाग करीत आहे. सेफ्टी विभागाने चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली जाईल. चौकशीनंतर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान संबंधित ठेकेदारावर रीतसर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यापुढे अशी दुर्घटना घडू नये याबाबत काळजी घेतली जाईल, असेही सोनवणे यांनी सांगितले.