गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

मर्यादापुरूषोत्तम राम

राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे केंद्रबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाचे नाव कोरलेले आहे. रामरंगी सगळे रंगले आहेत. राम आहे, म्हणूनच भारतीय जनतेत राम आहे. 'श्री राम जय राम जय जय राम' आणि 'गोपालकृष्ण आणि राधेकृष्‍ण' या त्यांच्या ह्रदयातून येणार्‍या घोषणा याच्या साक्षीदार आहेत.

प्रत्येकाच्या जीवनात राम एकरूप झालेले असून खेडेगावातील दोन व्यक्तींची गाठभेट झाल्यास ते आदराने हात जोडून 'राम राम' असे म्हणतात. 'राम रखे उसे कौन चाखे' या म्हणीप्रमाणे ईश्वराच्या संरक्षण शक्तीत मानवाचा दृढ विश्वास प्रतिबिंबित होतो. 'राम रखे ऐसे रहो' यात राम भक्तांची समर्पण वृत्ती दिसून येते. प्रभूच्या विश्वासावर चालणारा माणूस कोणत्याही नवीन कार्यासाठी 'राम भरोसे' असा शब्द प्रयोग करतो. एखाद्या सुव्यवस्थित आणि संपन्न राज्यासाठी 'राम राज्य' या शब्दाचा वापर केला जातो. आपल्या जीवनात प्रत्येक रूपाने राम एकरूप झालेला आहे.

मर्यादा पुरूषोत्तम श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला दुपार‍ी बारा वाजता कडक उन्हाच्या प्रहारात झाला होता. लोक राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. कारण, त्यांचा जन्म आणि जीवनाने संपूर्ण राष्ट्राला मार्गदर्शन केले आहे. सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहूनही पुरूष 'उत्तम' कसा होऊ शकतो. याची प्रचिती आपल्याला 'मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या' जीवनामुळे येते. मानव महत्त्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो. विकार, विचार आणि व्यावहारीक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना 'मर्यादा पुरूषोत्तम' असे म्हटले जाते.

मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा, त्यासाठी महर्षी वाल्मीकी यांनी राम चरित्र लिहले. 'सदगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम!' हे सर्व गुण स्वत: अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊन सर्वजण धन्य होतात. कारण, राम देव संस्कृतीचे संरक्षक होते. राक्षसी संस्कृतीचा नाश करणार्‍यांना भारतीय जनता डोक्यावर घेऊन नाचते. सामान्य जनतेनेही रामाला आपल्या ह्रदयात चिरंतन स्थान दिले आहे. ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे.

विश्वामित्र रामाला यज्ञाचे रक्षण करण्यासाठी घेऊन गेला होता. परंतु, तेथे त्यांनी रामाला जीवनाचे शिक्षण दिले. म्हणूनच विश्वामित्राकडून काहीतरी शिकलो असल्याची जाणीव रामाला झाली नाही आणि रामाला आपण शिक्षण दिले असल्याची जाणीय विश्वामित्राला झाली नाही. अशा प्रकारे विश्वमित्र दररोज रामाच्या जीवनात सांस्कृतिक प्रेमरूपी तूप भरत होते. विश्वामित्र रामाजवळ मनमोकळेपणाने बोलत असे.

राम आपल्यापुढे एक कौटुंबिक आदर्श आहेत. रामाला तीन भाऊ होते. परंतु, त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही. ज्या कुटूंबात दुसर्‍याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते. तेथे कधीही भांडणे होत नाहीत. रामाची मातृ-पितृ भक्ती खरोखरच अनुकरणीय आहे. वनवासात जाण्याची वडीलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली. अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाहीत किंवा व्यथित झाले नाहीत. राम वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत. ते नेहमी प्रसन्न असायचे. ज्या कैकयी मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले. तिच्याबद्दलही मनात कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते. हा प्रसंग रामाचे व्यक्तिमत्व दर्शवतो.

  WD
राम आणि सुग्रीव यांची मैत्रीही आदर्श होती. वालीला मारण्यासाठी राम सुग्रीवाला तर रावणाला मारून सीतेला परत आणण्यासाठी सुग्रीव रामाला मदत करतो. सुग्रीवावर रामाचे खूप प्रेम होते. त्याला थोडेही दु:ख झाले तरी रामाच्या डोळ्यात अश्रू येत असत. मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रूही असावा तर रामासारखा असे लोक म्हणत असत. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने अग्नी संस्कार करण्यास नकार दिला होता. 'मृत्यूबरोबर वैर संपत असते. म्हणून आपल्या भावाला अग्नीसंस्कार दे'. 'तू जर हे काम करत नसेल तर मी करतो. रावण जसा तुझा भाऊ होता तसा माझाही होता.' असे तेव्हा रामाने ब‍िभीषणाला सांगितले होते.

रामासारखा पती मिळावा, अशी प्रत्येक स्त्री कामना करत असते. रामाचे सीतेवर अमर्याद प्रेम होते. सीताही जन्मोजन्मी रामासारखा पती मिळावा म्हणून कामना करत होती. त्या दृष्‍टीकोनातून रामाचा सीता त्याग आत्म बलिदानाच्या उच्चतम भावनेचे प्रतीक आहे. रामाला आपली जन्मभूमी अतिशय प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाने बिभीषणाला दिले होते. परंतु, रामाला या राज्याचा मोह झाला नाही.

'दूर्लभं भारते जन्म' ज्या भूमीत जन्म दुर्लभ आहे, त्या भूमीत जन्म मिळाल्यावरच तेथील महानता समजेल? म्हणून रामनवमीच्या निमित्ताने राम चरित्र समजावून ते अंगीकारण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.