गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

पीडितेचा पुरावा दोषी ठरविण्यासाठी पुरेसा

WD
महिलेचा विनयभंग किंवा इतर लैंगिक अत्याचाराच्या घटनेप्रकरणी पीडित महिलेने सादर केलेला पुरावा हा आरोपीला दोषी ठरविण्यासाठी पुरेसा असून, त्याला पुष्टी मिळालीच पाहिजे हे गरजेचे नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

भावाच्या पत्नीचा विनयभंग करणा-या एका आरोपीला दोषी ठरवित असताना न्यायालयाने हे मत नोंदविले आहे. या प्रकरणात न्यायाधीशांनी पीडित महिलेने दिलेल्या पुराव्याच्या आधारेच आरोपीला दोषी ठरविले. अशाप्रकारचे पुरावे फक्त पीडितच देऊ शकते, असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले. घटनेची पाशर््वभूमी अशी की फिर्यादी महिला आणि तिचा पती यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. पीडित महिला आपल्या मुलासोबत त्याच घरात राहात होती. या परिस्थितीत अशाप्रकारची घटना घडल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला मदत न करणे साहजिकच आहे, असे न्या. रोशन दळवी यांनी आपल्या निर्णयात नमूद केले. पीडितेची प्रदीर्घ उलटतपासणी करण्यात आल्यानंतर तिने दिलेल्या पुराव्यात काहीही गैर आढळले नाही. तिच्यावतीने इतर कुणीही साक्ष देऊ शकत नाही, असे न्या. दळवी यांनी आपल्या १० जून रोजीच्या आदेशात म्हटले आहे.