मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (10:19 IST)

मुंबईत येणार १० हजार वाहने, शिंदे गटाकडून १० कोटींचा खर्च

eknath shinde
संपूर्ण देशासाठी उद्या दसऱ्याचा सण असला तरी शिवसेनेच्या दोन गटांसाठी मात्र ताकद दाखविण्याची पर्वणीच आहे. अधिकाधिक शिवसैनिकांना आपल्या गोटात आणण्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याचे मोठे निमित्त ठरणार आहे, जिथे जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचा प्रयत्न दोन्ही गट करत आहेत. या मेळाव्याची तयारी एवढ्या जोरात सुरू आहे की, १० हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत पोहोचणार आहेत. यामध्ये ६ हजार सरकारी आणि खासगी बसेसचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ३ हजार कारमधून कार्यकर्ते मेळाव्यात पोहोचतील.
 
शिवसेनेच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षात एवढी मोठी फूट पडली आहे. तसेच, वेगवेगळ्या गटांनी दसरा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी गर्दी जमवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सभेला कार्यकर्त्यांना आणण्यासाठी शिंदे गटाने सुमारे १८०० सरकारी बसेस बुक केल्या आहेत. यासाठी १० कोटी रुपये रोख देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. ३ हजार खाजगी कारचे बुकिंग आधीच झाले आहे. वांद्रे कुर्ला संकुलात एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होत आहे. यात एक ते दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor